- राष्ट्रीय विद्युत सुरक्षा चर्चासत्र उत्साहात संपन्न; “पुढील वर्षासाठी शून्य विद्युत अपघाताचे लक्ष्य” – आयुक्त अभिनव गोयल ।
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विद्युत सुरक्षा चर्चासत्र आज दि. १० मार्च २०२६ रोजी आचार्य अत्रे कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आले. या चर्चासत्राचे उद्घाटन महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अभिनव गोयल यांच्या हस्ते झाले. या चर्चासत्रामध्ये विद्युत क्षेत्रातील सुरक्षितता, अपघात प्रतिबंधक उपाययोजना तसेच कायदेशीर बाबी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, भिवंडी व नवी मुंबई येथील महानगरपालिका विद्युत अभियंते, विद्युत कर्मचारी, विद्युत ठेकेदार व त्यांचे कर्मचारी तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या क्षेत्रातील सर्व ठेकेदार व त्यांच्या टीमला सुरक्षित कामकाजाबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी आयुक्त श्री. अभिनव गोयल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, विद्युत सुरक्षेबाबत प्रत्येक कामासाठी आवश्यक चेकलिस्ट तयार करून ती काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच या विषयाबाबत विद्यार्थ्यांमध्येही जागरूकता निर्माण होणे गरजेचे असून त्यांनाही या विषयाच्या शिक्षणात सहभागी करून घेण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. फक्त चर्चा करून थांबणे योग्य नसून या चर्चासत्रातून मिळालेल्या सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. पुढील वर्षासाठी “शून्य विद्युत अपघात” हे उद्दिष्ट ठेवून सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमात विद्युत निरीक्षक राजेंद्र यादव यांनी “Electrical safety साठी कायदेशीर चौकट व विद्युत निरीक्षकाची भूमिका”, सहाय्यक विद्युत निरीक्षक श्री. अर्जुन जाधव यांनी “विद्युत अपघात व आग लागण्याची कारणे तसेच सुरक्षा उपाय” तर शाखा अभियंता श्री. भूपण मानकामे यांनी “Electrical job safety analysis” या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल थोरात यांची विशेष उपस्थिती होती व चौधरी कार्यकारी अभियंता महावितरण आणि राजू राठोड, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) महापालिका उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत) प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता (विद्युत) जितेंद्र शिंदे तसेच उपअभियंता (विद्युत) भागवत पाटील व जितेंद्र पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व अधिकारी, अभियंते, कंत्राटदार व कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती व सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळण्याची सामूहिक शपथ घेतली.या चर्चासत्रामुळे विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती होऊन अपघात प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले ।
