- कल्याणमध्ये प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची भाजपा आमदार किसन कथोरे ची मागणी ।
कल्याण : कल्याण शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या तसेच परिसरातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ आणि उल्हासनगर या तालुक्यांतील नागरिकांची वाढती गरज लक्षात घेऊन कल्याणमध्ये प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार किसन कथोरे यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे. सध्या पासपोर्टसंदर्भातील कामांसाठी या भागातील नागरिकांना दूरच्या कार्यालयांवर अवलंबून राहावे लागते. कल्याण हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्यास कल्याणसह शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ आणि उल्हासनगर परिसरातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे आमदार कथोरे यांनी निवेदनात नमूद केले आहे. या मागणीवर केंद्र आणि राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेऊन कल्याणमध्ये लवकरात लवकर प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ।
