- भाजपा पदाधिकारी दुर्गेश बागुल राजीनाम्यानंतर , कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश ।
डोंबिवली : भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर कल्याण पूर्वेतील भाजपा पदाधिकारी दुर्गेश बागुल यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर बागुल यांनी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मराठी माणसाची अस्मिता आणि मराठी भाषेचा झालेला अपमान कधीही सहन करणार नसल्याचे बागुल यांनी सांगितले. भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला असून हे भाजपात राहून सहन करणे शक्य नव्हते. यानंतर परब यांनी आपल्यावर माफीनाम्यासाठी दबाव टाकला, माफी माग नाहीतर पक्षाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्यानुसार आपण मराठीसाठी भाजपाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्ष सुरवाती पासून मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढा देत आहे. मराठीला न्याय देणाऱ्या पक्षासोबत जाण्याचे कार्यकर्त्यांसोबत ठरले असून त्यानुसार दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यासोबत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचा डीएनए हा मराठी माणसाचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादाच्या विचारधारेसह प्रांतीय भाषेचे संवर्धन देखील झाले पाहिजे म्हणून शिवसेना पक्षात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया दुर्गेश बागुल यांनी दिली.
