- डोंबिवली पूर्वेकडील नेहरू मैदानात एका मंडळाने अनधिकृत शेड, कंटेनर आणि बांधकाम केल्याचा प्रकार , मनसे शहराध्यक्ष हर्षद पाटील निवेदन देत आयुक्त अभिनव गोयल यांचे कारवाईची मागणी ।
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत ७३ उद्याने आणि १७ मैदाने आहेत. यापैकी डोंबिवली पूर्वेकडील नेहरू मैदानात एका मंडळाने अनधिकृत शेड, कंटेनर आणि बांधकाम केल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी सचित्र निवेदन देत आयुक्त अभिनव गोयल यांचे लक्ष वेधून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाने महासभेत स्पष्ट केले आहे की १७ मैदानांपैकी एकही मैदान भाडेतत्त्वावर किंवा कराराने दिलेले नाही. त्यामुळे नेहरू मैदानातील बांधकाम अनधिकृत असल्याचे स्पष्ट होते. मोठ्या प्रमाणात कमान उभारून केडीएमसीचा उल्लेख केला असला तरी खासगी निधी वापरला गेला आहे आणि अधिकाऱ्यांना याची माहिती नसल्याचे सांगण्यात आले. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मैदानाच्या पाठीमागे सफाई कर्मचाऱ्यांच्या वस्तीसाठी उभारलेल्या शौचालयाच्या जागीच मंडळाने कार्यालय थाटल्याचा आरोप आहे. सार्वजनिक मैदान हडप होत असल्यास मुलांना खेळायला जागा राहणार नाही. प्रशासनाने तातडीने चौकशी करून अतिक्रमण हटवावे आणि मैदान नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी करण्यात आली आहे
