आयुक्तांनी नियमबाह्य वर्तन करणाऱ्या आणि शस्त्राचा दुरुपयोग करणाऱ्या एकूण १५ व्यक्तींचे शस्त्र परवाने तात्काळ प्रभावान रद्द केले ।

  • आयुक्तांनी नियमबाह्य वर्तन करणाऱ्या आणि शस्त्राचा दुरुपयोग करणाऱ्या एकूण १५ व्यक्तींचे शस्त्र परवाने तात्काळ प्रभावान रद्द केले ।

पुणे : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि शस्त्रांच्या संभाव्य गैरवापराला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS) यांनी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. शस्त्र परवाना प्रकरणांचा सर्वंकष आढावा घेत आयुक्तांनी नियमबाह्य वर्तन करणाऱ्या आणि शस्त्राचा दुरुपयोग करणाऱ्या एकूण १५ व्यक्तींचे शस्त्र परवाने तात्काळ प्रभावान रद्द केले आहेत. याशिवाय, नवीन शस्त्र परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या तब्बल ६८ व्यक्तींना कसल्याही प्रकारचा सबळ आधार नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे अर्ज फेटाळून लावण्यात आले आहेत. ७ जून २०२६ रोजी आयुक्तालयाच्या जनसंपर्क कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.या धडक कारवाईत प्रामुख्याने शस्त्राचा दुरुपयोग करणे आणि गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या ५ प्रमुख परवानाधारकांवर थेट कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये हिंजवडी येथील मयूर काळूराम भोईर (वय ३०), नवी सांगवी येथील सुभाष भिकाजी सपकाळ (वय ७०), भोसरीचे विजय नामदेव लांडे (वय ४८), देहूगावचे साहिल राजेंद्र ढमाले (वय ३२) आणि आंबेठाण येथील शांताराम दत्तात्रय चव्हाण (वय ४१) यांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध गुन्हेगारी कारवाया आणि शस्त्रांच्या गैरवापराच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी तात्काळ प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते आणि त्यात कसूर आढळल्याने त्यांचे परवाने रद्द करण्यात आले. परवाने रद्द झालेल्या उर्वरित १० प्रकरणांमध्ये प्रशासकीय नियमांचे उल्लंघन आणि नैसर्गिक कारणांचा समावेश आहे. यामध्ये शस्त्र परवाना मंजूर होऊनही विहित मुदतीत अधिकृतपणे शस्त्र खरेदी न करणाऱ्या २ व्यक्तींचे परवाने रद्द करण्यात आले. तसेच, ज्या शस्त्र परवानाधारकांना कमालीचे वृद्धत्व आले आहे किंवा ज्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे, अशा एकूण ८ परवानाधारकांचे परवाने नियमानुसार रद्द करण्यात आले आहेत. दुसरीकडे, नवीन शस्त्र परवाना मिळवण्यासाठी आयुक्तालयाकडे आलेल्या अर्जांची स्थानिक पोलिसांमार्फत अत्यंत सखोल चौकशी करण्यात आली. या प्राथमिक चौकशीत ६८ अर्जदारांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे अथवा त्यांना शस्त्र मंजूर करण्यासाठी कोणतेही सबळ कारण किंवा ठोस आधार नसल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे पोलीस आयुक्तांनी हे सर्व ६८ अर्ज फेटाळले. भविष्यातही शहरात शस्त्र परवान्यांबाबत असेच अत्यंत कडक आणि पारदर्शक धोरण अवलंबले जाईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने दिला आहे ।