- काही महिन्यातच आणखी हजारोंच्या संख्येने सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील लोक प्रवेश घेणार : जनार्दन म्हात्रे
डोंबिवली : राज्यभर शिवसेना (शिंदे गटात) पक्षात प्रवेशाचे वारे सर्वदूर वाहत असतानाच डोंबिवली त्यापासून दूर नाही असे चित्र पुन्हा दिसून आले. रविवारी शहरातील सार्वजनिक नऊ मंडळांचा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शेकडोंच्या संख्येने शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश घेतला. या प्रवेश कार्यक्रमात महिलांची संख्या मोठी होती. या सर्वांनी केडीएमसी शिवसेना माजी सभापती जनार्दन म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रवेश केला. आमदार राजेश मोरे यांनी प्रत्येकाच्या हातात भगवा देऊन आमदार राजेश मोरे यांनी सर्वांचे स्वागत केले. रविवारी संध्याकाळी पश्चिमकडील महात्मा फुले रस्त्यावरील ज्ञानेश्वर सभागृहात शिवसेना (शिंदे गट) माध्यमातून विद्यार्थांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम होता. यावेळी आमदार राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शिवसेना सचिव संतोष चव्हाण, माजी स्थायी सभापती जनार्दन म्हात्रे, नगरसेविका रेखा म्हात्रे, प्रियदर्शनी म्हात्रे, केतकी पोवार, सागर जेधे, संजय पावशे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पश्चिम विभागातील आत्मविश्वास नवरात्र मित्रमंडळ, न्यू एकता मित्रमंडळ विघ्नहर्ता गणेशोत्सव मित्रमंडळ, गणेशोत्सव मित्रमंडळ, एकदंत मित्रमंडळ भोईर जिमखाना फुले रोड सदस्य, आत्मविश्वास गोविंदा पथक तसेच राष्ट्रवादी अजित पवार पदाधिकारी व कार्यकर्ते अशा शेकडोंच्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जनार्दन म्हात्रे यांनी जाहीर केले की येत्या काही महिन्यातच आणखी हजारोंच्या संख्येने सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील लोक प्रवेश घेणार आहेत. त्यामुळे पक्षाचा विस्तार मोठा होत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामावर लोक खुश आहेत. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मोफत वह्या व नागरिकांना छत्री वाटप करण्यात आली ।
