- उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश ।
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची दिली उमेदवारी ।
मुंबई : शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा खासदारांना गळाला लावल्यानंतर आता ऑपरेशन टायगरची दुसरी इनिंग सुरू झाली असून उद्धव ठाकरे यांना पहिला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय तसेच विश्वासू आमदार म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून त्यांना विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. सचिन अहिर यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाने एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा शह दिल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नाराज नेत्यांना हेरून त्यांना शिवसेनेत पक्षप्रवेश देण्याचा झपाटा एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच्या दीड वर्षांनी ऑपरेशन टायगर राबवून सहा खासदारांना गळाला लावण्याची किमया एकनाथ शिंदे यांनी साधली. त्यानंतर आता पुढचा टप्पा ‘आमदारांचा प्रवेश’ असे खुलेआमपणे एकनाथ शिंदे यांच्या वतीने सांगण्यात आले. ठाकरे फुटीरांच्या मतदारसंघात जाऊन तोंडसुख घेत असताना इकडे मुंबईत आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ ज्यांच्यामुळे सेफ होता, त्याच सचिन अहिर यांना फोडून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का दिला आहे. विधान परिषदेचे सभापतीपद भाजपकडे असल्याने उपसभापतीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार असल्याचे निश्चित होते. त्यासाठी नीलम गोऱ्हे, मनिषआ कायंदे, कृपाल तुमाने अशा दिग्गजांची नावे चर्चेत होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांना फोडून रातोरात निवडणुकीची गणिते बदलून टाकली. सचिन अहिर यांच्या अधिकृत प्रक्षप्रवेशाआधी त्यांना उपसभापतीपदाची उमेदवारी दिली. त्यांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे उपस्थित होत्या ।

Post Views: 393