- शाश्वत व सुरक्षित कल्याण डोंबिवलीसाठी ७ स्टेपचा मंत्र – उपक्रम सोसायट्या नागरिकांच्या दारी ।
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून शहराला शाश्वत व सुरक्षित दिशेने नेण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. यामाध्यमातून महापालिका क्षेत्रातील सोसायट्या, इमारती व नागरिकांसाठी विशेष चर्चा सत्राचे आयोजन १ मे २०२६ रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर, प्रेस कॉन्फरन्स हॉल,कल्याण प. येथे करण्यात आले. या चर्चासत्रात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ” ७ शाश्वत स्टेप ” राबविण्याचा निर्धार करण्यात आला. यामध्ये कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जेदारे वीज बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, सांडपाण्याचा पुनर्वापर , वृक्ष लागवड, विद्युत सुरक्षा तपासणी आणि अग्नीसुरक्षा उपयोजना यांचा समावेश आहे. नागरिकांनी या सर्व बाबींमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या दरम्यान विद्युत स्टेप संदर्भातील पुस्तिकेचे उद्घाटन महापौर हर्षाली चौधरी यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी आयुक्त अभिनव गोयल, नगरसेविका विजयताई पोटे, नगरसेवक गणेश जाधव, कार्यकारी अभियंता विद्युत प्रशांत भागवत, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, अतिरिक्त शहर अभियंता जगदीश कोरे, विद्युत सुरक्षा तपासणीचे प्रादेशिक संचालक भूषण मंकाने, मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी , सहाय्यक विद्युत अभियंता जितेंद्र शिंदे यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि सोसायटी प्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर हर्षाली चौधरी यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की,” आयुक्तांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या हे चर्चासत्र अत्यंत उपयुक्त असून, प्रत्येक नागरिकांने ७ शाश्वत स्टेप स्वीकारणे ही काळाची गरज आहे.” तर आयुक्त अभिनव गोयल यांनी वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाश्वत व सुरक्षितता विकासासाठी नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करत, सोसायट्या व रहिवाशांनी पुढाकार घेऊन या उपक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान केले. महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहरात पर्यावरणापूरक , सुरक्षित आणि शाश्वत जीवनशैली रुजवण्यास मोठी चालना मिळणार असल्याचे चित्र आहे ।
