- अवैध अग्निशस्त्रांचा मोठा साठा व लाखोंच्या बनावट नोटा जप्त करत एका सराईत गुन्हेगारास अटक ।
डोंबिवली : कल्याण गुन्हे शाखा युनिट-३ ने केलेल्या धडक कारवाईत अवैध अग्निशस्त्रांचा मोठा साठा व लाखोंच्या बनावट नोटा जप्त करत एका सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक केले जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-३ कल्याणकडून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असताना सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार डोंबिवली पूर्व येथील दावडी परिसरात राहणारा सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय ५५) हा अवैध शस्त्रसाठा बाळगून असल्याची खात्री पटली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या राहत्या घरावर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक बाब समोर आली. घरातील टेरेसवर गुप्त कप्पा तयार करून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे व दारुगोळा लपवून ठेवण्यात आला होता.या छाप्यात पोलिसांनी ३ देशी बनावटीचे पिस्टल, १ सिक्सर रिव्हॉल्वर, ७ गावठी कट्टे, १ रिकामी मॅगझिन, २ एअर गन, ४०५ जिवंत काडतुसे, १६७ छरे, २ धारदार तलवारी, ३ कोयते, १ धारदार सुरा, १ बटन चाकू, २ लोखंडी रॉड तसेच २ मोबाईल फोन असा मोठा साठा जप्त केला. यासोबतच ३ लाख ५२ हजार रुपयांच्या जुन्या व नवीन बनावट नोटाही हस्तगत करण्यात आल्या. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १२ लाख २१ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायदा कलम ३, ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील करत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेला सुरेंद्र पाटील हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अपहरण, घरफोडी, मारहाण, धमकी, शस्त्र बाळगणे आदी गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. त्यामुळे त्याच्या अटकेमुळे परिसरात दिलासा व्यक्त केला जात आहे. ही कारवाई आशुतोष डुंबरे साो, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर व शेखर बागडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहा.पो.निरी. सर्जेराव पाटील, सहा.पो.निरी. बळवंत भराडे, पोउपनिरी किरण भिसे, सपोउपनिरी दत्ताराम भोसले, सहा.पो.उप निरी. बालाजी शिंदे, पोहवा/विजय जिरे, पोहवा पांडुरंग भांगरे, पोहवा/सुधीर कदम, पोहवा/सचिन भालेराव, पोहवा/विलास कडु, पोहवा/सचिन कदम, पोहवा/आदिक जाधव, पोहवा/गोरक्षनाथ पोटे, पोहवा/प्रशांत वानखेडे, पोहवा/उल्हास खंडारे, पोना/दिपक महाजन पोना/प्रविण किनरे, पोशि/गुरूनाथ जरग, पोशि/मिथुन राठोड, पोशि/विनोद चन्ने, पोशि/गणेश हरणे, पोशि/गोरक्ष शेकडे, पोशि/जालिदंर साळुंखे पोशि/सतिश सोनावणे व म.पो.शि./ मंगल गावित चालक पोहवा/सपोउपनि बोरकर, सर्व नेम. गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यांनी केलेली आहे ।
