- अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत वयोवृद्ध नागरिकाची फसवणूक ,विष्णूनगर पोलिसांनी दीपक सावंत ला अटक ।
डोंबिवली : अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत वयोवृद्ध नागरिकाची फसवणूक केल्याचा प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे. मुलीच्या लग्नातील कथित ‘दोष’ दूर करण्याच्या बहाण्याने एका भोंदूबाबाने सोन्याचे दागिने व चांदीची नाणी लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी दीपक सावंत याला कल्याण परिसरातून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती आपल्या मुलीच्या विवाहात अडथळे येत असल्याने उपाय शोधत होती. याच परिस्थितीचा फायदा घेत दीपक सावंत याने स्वतःला ‘बाबा’ म्हणून भासवून विशेष विधी करून दोष दूर करण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार, विधीच्या नावाखाली त्याने पीडितांकडून सोन्याचे ब्रेसलेट आणि चांदीची नाणी घेतली. विधीदरम्यान आरोपीने दागिने लाल रंगाच्या रुमालात ठेवण्यास सांगितले. त्याचवेळी चलाखीने रुमालाची अदलाबदल करून मौल्यवान दागिने लंपास केले. त्यानंतर दुसरा रुमाल देत आरोपी तेथून पसार झाला. काही वेळाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीला कल्याण परिसरातून अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची शक्यता व्यक्त होत आहे.दरम्यान, नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता अशा ‘विधी’ किंवा ‘उपायां’पासून सावध राहावे, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे यांनी केले आहे ।
