कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची महासभा संपन्न – स्थायी , महिला व बालकल्याण,शिक्षण समित्यांच्या नियुक्ती ; पाणीप्रश्नावर स्वतंत्र महासभेची मागणी ।

  • कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची महासभा संपन्न – स्थायी , महिला व बालकल्याण,शिक्षण समित्यांच्या नियुक्ती ; पाणीप्रश्नावर स्वतंत्र महासभेची मागणी ।
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा १६ मार्च २०२६ रोजी दु. १२.३० वा. दरम्यान महापालिका प्रशासन भवन कल्याण प.येथे पार पडली. या महासभेत स्थायी समिती, शिक्षण समिती तसेच महिला व बालकल्याण,दिव्यांग कल्याण ,नागरी दलित वस्ती सुधारणा आणि झोडपट्टी पुनर्वसन समितीच्या सदस्यांची सर्व पक्षांच्या संख्याबळानुसार गटनेत्यांच्या प्रस्तावावरून नियुक्ती करण्यात आली. महासभेदरम्यान कर, पाणीपुरवठा, नाले व गटारे या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. शहरातील सर्व प्रभागांमध्ये पाणी प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनला असल्याने यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र महासभा बोलवावी अशी मागणी अनेक नगरसेवक व नगरसेविकांनी महापौर एडवोकेट. हर्षाली चौधरी यांच्याकडे केली. यावर महापौर चौधरी यांनी प्रशासनाला पाणी प्रश्नावर स्वातंत्र महासभा घेण्याबाबत सूचना दिल्या. दरम्यान, विरोधी पक्षनेते उमेश बोरगावकर यांच्या वडिलांचे निधन झाल्याने महासभेच्या सुरुवातीला सर्व सदस्यांनी स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामाबद्दल आणि कोट्यावधी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्याचा ठराव महासभेच्या पटलावर मांडण्यात आला. हा ठराव सर्व सदस्यांच्या सहमतीने मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र महानगरपालिका आधीनियमानुसार स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये भाजपाचे दीपेश म्हात्रे, मंदार हळबे, मनीषा गायकवाड, दया गायकवाड, उपेक्षा भोईर, मुकुंद पेडणेकर, नंदू म्हात्रे, शिवसेना ( शिंदे गट) गजानन पाटील, विकास म्हात्रे, मलेश शेट्टी , जयवंत भोईर, नवीन गवळी, महेश गायकवाड, गणेश लांडगे, विजया पोटे तर उबाठा शिवसेनेचे विशाल गारवे यांचे नियुक्ती महापौर हर्षाली चौधरी यांनी जाहीर केली. तसेच शिक्षण समिती साठी सर्व पक्षांच्या गटनेत्यांकडून प्रस्ताव मागून सदस्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये शिवसेना ( शिंदे ) चे रेखा म्हात्रे, ज्योती मराठे, अस्मिता मोरे, सारिका जाधव, रसिका संदेश पाटील भाजपाचे पूजा गायकवाड ,डॉ. सुनिता पाटील, रवीना माळी, मेघा खेमा, सरोज राय तर उबाठा शिवसेना तेजश्री गायकवाड यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी सभागृह नेते म्हणून भाजपचे वरुण पाटील यांचे नाव महापौर हर्षाली चौधरी यांनी घोषित केले. दरम्यान, महासभेत उपस्थितीत विविध समस्या आणि विषयावर पुढील बोलवण्यात येणाऱ्या स्वतंत्र महासभेत सविस्तर विषय महासभेसमोर  निर्णय घेण्यात मांडण्यात येतील अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली ।