- कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा १६ मार्चला – स्थायी समिती निवड , कोट्यवधींच्या विकासकामांवर निर्णय
डोंबिवली : कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा १६ मार्च २०२६ रोजी स. ११ वा. दरम्यान महापालिका भवन, चौथा मजला , शंकरराव चौक, कल्याण प. येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत विविध महत्त्वाच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती महापालिका सचिव किशोर शेळके यांनी दिली आहे. सभेत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार स्थायी समितीची रचना करण्यात येणार असून पालिका सदस्यांमधून १६ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. तसेच महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती सुधारणा आणि झोपडपट्टी पुनर्वसन समिती ११ सदस्यांची तसेच शिक्षण समितीच्या ११ सदस्याचीही निवड केली जाणार आहे. याशिवाय सन – २०२६ – २७ या वर्षासाठी मालमत्ता करायचे दर निश्चित करण्याबाबतचा प्रस्तावही सभेत मांडला जाणार आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर शहरातील मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी सुमारे ४ कोटी २९ लाख ९२ हजार १५७ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याचा विषयही सभेसमोर ठेवण्यात येणार आहे. कल्याण – डोंबिवली विभागातील रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्ती कामासाठी सुमारे ३४ कोटी ३६ लाख ८२ हजार रुपयांच्या खर्चास मंजुरी घेण्याचा प्रस्तावही चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. तसेच उल्हास नदीत मिसळणाऱ्या गाळेगाव व मोहने नाल्यातील सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सुमारे ६ कोटी ४७ लाख १४ हजार १०५ रुपयांच्या प्रकल्पालाही प्रशासकीय मान्यता देण्याचा विषय सभेत येणार आहे . दरम्यान, महापालिका भवन इमारतीचा सविस्तर प्रकल्प अहवाल ( DPR ) तयार करून राज्य शासनाकडून निधी मिळण्यासाठी पाठवण्याचा प्रस्तावही मांडण्यात येणार आहे. तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, त्यातून निर्माण होणारे आरोग्य व सुरक्षेचे प्रश्न यावर उपयोजना करण्याबाबत प्रशासनाला निर्देश घेण्याचा मुद्दाही चर्चेत येणार आहे. शहरातील रस्ते खड्डे मुक्त, स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त करण्याबाबतही सभेत विचारविनिमय होणार असून या सर्व विषयांवर महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे ।
