- कल्याण-शिळफाटा मार्गावरील मानपाडा जंक्शन येथे दररोज निर्माण होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली ।
डोंबिवली : कल्याण-शिळफाटा मार्गावरील मानपाडा जंक्शन येथे दररोज निर्माण होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत मानपाडा जंक्शनची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या बैठकीत भाजपा नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी एमएमआरडीएचे चीफ इंजिनीयर प्रफुल जामदार, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त किरण बेलवडकर, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, डोंबिवली वाहतूक शाखेचे श्रीराम पाटील, प्रभाग क्षेत्र अधिकारी सचिन तामखेडे तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांसोबत वाहतूक समस्येवर सविस्तर चर्चा केली. यावेळी नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास कमी व्हावा आणि वाहनांची सुरळीत हालचाल व्हावी यासाठी अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामध्ये खड्डेमय रस्त्यांची त्वरित दुरुस्ती, आवश्यक ठिकाणी रस्त्यांच्या वळणांचा विस्तार, अंतर्गत रस्त्यांसाठी दिशादर्शक फलक उभारणे, मेट्रो प्रकल्पाच्या कामाचे वाहतुकीच्या दृष्टीने योग्य नियोजन करणे, महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक वॉर्डन्सची संख्या वाढविणे, मेट्रोचे काम अधिक गतीने पूर्ण करणे, लेन शिस्तीसाठी अतिरिक्त बॅरिकेड्स उभारणे आणि शक्य त्या ठिकाणी रस्त्याची रुंदी वाढविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचा समावेश आहे ।
