उल्हासनगर सुपर स्पेशालिटी कॅशलेस रुग्णालयाला महाराष्ट्रातील पहिले ‘एनएबीएच प्रवेशस्तर मानांकन

  • उल्हासनगर सुपर स्पेशालिटी कॅशलेस रुग्णालयाला महाराष्ट्रातील पहिले ‘एनएबीएच प्रवेशस्तर मानांकन
  • खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने रुग्णालयाची उभारणी ।

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी कॅशलेस रुग्णालयाने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. महाराष्ट्रातील महापालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये प्रथमच या रुग्णालयाला ‘एनएबीएच प्रवेशस्तर मानांकन (NABH Entry Level Certification)’ प्राप्त झाले आहे. या मानांकनामुळे रुग्णालयातील उपचारांची गुणवत्ता, रुग्ण सुरक्षितता आणि आरोग्यसेवेची उत्कृष्टता राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे. उल्हासनगर येथील म्हारळ रोडवरील रिजेन्सी अँटिलिया परिसरात उभारण्यात आलेले हे २०० खाटांचे अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी कॅशलेस रुग्णालय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष पुढाकारातून साकार झाले. सुमारे अडीच ते तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या रुग्णालयात आजपर्यंत लाखो गरजू नागरिकांवर मोफत व सवलतीच्या दरात उपचार करण्यात आले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही खासगी रुग्णालयांप्रमाणे दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश होता. या रुग्णालयात २०० खाटांची सुविधा, ५ अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, ३२ अतिदक्षता (आयसीयू) खाटा, २४ तास कार्यरत कॅथलॅब, सीटी स्कॅन, एक्स-रे, द्विमितीय हृदय तपासणी (२-डी इको), सोनोग्राफी, हृदयरोगांवरील उपचार, कर्करोग उपचार, मेंदूविकारांवरील उपचार, प्रसूती व विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांच्या धर्तीवरील आरोग्यसेवा एकाच छताखाली उपलब्ध होत आहे. याशिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच पिवळे व केशरी रेशनकार्डधारक नागरिकांना या रुग्णालयात विविध आजारांवरील उपचार मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळत असून, हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी वरदान ठरत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि दर्जेदार आरोग्यसेवेच्या ध्येयातून उभारण्यात आलेल्या या कॅशलेस रुग्णालयाला आता मिळालेले ‘एनएबीएच प्रवेशस्तर मानांकन’ हे गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेवर उमटलेली अधिकृत विश्वासाची मोहोर आहे. महाराष्ट्रातील महापालिका रुग्णालयांसाठी हा एक नवा आदर्श निर्माण करणारा टप्पा असून, कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी ही अभिमानाची बाब आहे.

  • ‘एनएबीएच प्रवेशस्तर मानांकन’ म्हणजे काय?

राष्ट्रीय रुग्णालय मानांकन मंडळ (एनएबीएच) ही भारतातील रुग्णालयांच्या गुणवत्ता, रुग्ण सुरक्षितता आणि आरोग्यसेवेच्या निकषांचे मूल्यमापन करणारी राष्ट्रीय स्तरावरील मानांकन संस्था आहे. या संस्थेकडून दिले जाणारे ‘प्रवेशस्तर मानांकन’ हे रुग्णालयाने रुग्ण सुरक्षितता, उपचारांची गुणवत्ता, संसर्ग नियंत्रण, स्वच्छता, औषध व्यवस्थापन, आपत्कालीन सेवा, प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ आणि रुग्णकेंद्रित सेवा यांसारख्या राष्ट्रीय मानकांची यशस्वी पूर्तता केल्याची अधिकृत पावती मानली जाते. हे मानांकन मिळाल्यामुळे संबंधित रुग्णालयात गुणवत्तापूर्ण, सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध असल्याचे प्रमाणित होते. उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी कॅशलेस रुग्णालय हे महाराष्ट्रातील महापालिकेच्या अखत्यारीतील पहिले रुग्णालय ठरले आहे, ज्याला ‘एनएबीएच प्रवेशस्तर मानांकन’ प्राप्त झाले आहे. ही बाब राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद टप्पा मानली जात आहे ।