टॉरंट पॉवरचे आवाहन: मान्सूनमध्ये जीवघेणे अपघात आणि वीजपुरवठा खंडित होणे टाळण्यासाठी अनधिकृत विजेचा वापर त्वरित थांबवा ।

  • टॉरंट पॉवरचे आवाहन: मान्सूनमध्ये जीवघेणे अपघात आणि वीजपुरवठा खंडित होणे टाळण्यासाठी अनधिकृत विजेचा वापर त्वरित थांबवा ।

ठाणे : पावसाळा जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, टॉरंट पॉवर लिमिटेडने जनहितार्थ एक महत्त्वाची सुरक्षा सूचना जारी केली आहे. नागरिकांनी अनधिकृत विजेचा वापर पूर्णपणे थांबवावा आणि केवळ कायदेशीर व मीटर असलेल्या वीज जोडणीचाच वापर करावा, असे आवाहन कंपनीने केले आहे. काही व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी निश्चित सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर वीज पुरवठा घेत असल्याचे कंपनीने अधोरेखित केले आहे. अशा अनधिकृत हुक आणि बायपास पद्धतींमुळे संपूर्ण वीज यंत्रणा कमकुवत आणि धोकादायक बनते. यामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होतो. या असुरक्षित नेटवर्कचा थेट परिणाम नियमित वीज वितरणावर होतो। अशा निकृष्ट दर्जाच्या बेकायदेशीर जोडण्यांमुळे वीज वाहिन्यांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड (फॉल्ट) होतात. परिणामी, स्थानिक ट्रान्सफॉर्मर, यंत्रणेवर अतिरिक्त ताण येणे आणि वीज पुरवठा खंडित होणे अशा समस्या निर्माण होतात। याचा फटका प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना बसतो. या असुरक्षित नेटवर्कचे परिणाम केवळ वीज जाण्यापुरते मर्यादित नाहीत। यामुळे शॉर्ट सर्किट आणि आग लागण्यासारख्या गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता प्रचंड वाढते। अशा धोकादायक परिस्थितीमुळे निष्पाप नागरिकांही आपला जीव गमवावा लागू शकतो. पावसाळ्यात हा धोका अधिकच गंभीर बनतो। मुसळधार पाऊस, ठिकठिकाणी साचणारे पाणी आणि हवेतील ओलसरपणामुळे हे अनधिकृत आणि निकृष्ट दर्जाचे विजेचे तार अत्यंत संवेदनशील बनतात. यामुळे करंट पसरून मोठे अपघात होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. मानवी जीवनाचे रक्षण करण्यासाठी आणि अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, टॉरंट पॉवर जनतेला जबाबदारीने वागण्याचे जाहीर आवाहन करत आहे. नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांपासून दूर राहावे आणि केवळ अधिकृत, मीटर असलेल्या वीज पुरवठ्याचाच वापर करावा. नागरिक विजेचा बेकायदेशीर वापर किंवा वीज चोरीची माहिती टॉरंट पॉवरच्या 24×7 हेल्पलाइन वर कॉल करून देऊ शकतात ।