जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी , शिवसंवाद दौऱ्यात खासदार डॉ. शिंदेंनी घेतला निफाड व चांदवड मतदार संघाचा आढावा ।

  • जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी , शिवसंवाद दौऱ्यात खासदार डॉ. शिंदेंनी घेतला निफाड व चांदवड मतदार संघाचा आढावा ।
  • पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार डॉ. शिंदेंचा ‘वंदे भारत’ने प्रवास ।

नाशिक : राज्यातील मतदार याद्यांचे पुनरीक्षण, आगामी जिल्हा परिषद निवडणूक आणि पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये आज निफाड आणि चांदवड या दोन विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला. या बैठकीसाठी खासदार डॉ. शिंदे यांनी मुंबई ते नाशिक ‘वंदे भारत’ ट्रेनने प्रवास केला. या बैठकीला मंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार आनंद परांजपे व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, निफाड आणि चांदवडमधील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. निवडणूक आयोगाकडून लवकरच मतदार यादी पुनरीक्षण मोहीम राबवली जाईल, त्यासाठी पक्ष बूथ लेव्हल एजंटची नेमणूक करत आहे. शिवसेना मतदार यादी पुनरीक्षण मोहीमेबाबत गंभीर असून पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने बीएलए नियुक्ती आणि प्रशिक्षणाचे काम पक्षाकडून हाती घेण्यात आल्याचे ते खासदार डॉ. शिंदे म्हणाले. ओबीसी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर गेल्याने नाशिक जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. महापालिका आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेला चांगलं यश मिळाले होते. त्यामुळे राज्यातील उर्वरित जिल्हा परिषद निवडणुकांवर पक्षाने लक्ष केंद्रीत केल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. शिवसंवाद दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात नाशिकमधील विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. या आठवड्याच्या सुरुवातीला खासदार डॉ. शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि देवळाली या विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसर आणि इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर खासदार डॉ. शिंदे यांनी नाशिक दौऱ्यात ईलेक्ट्रिक वाहने वापरली होती. आज दुसऱ्यांदा नाशिक जिल्ह्याचा दौरा करताना वाहनांचा ताफा बाजूला ठेवत खासदार डॉ. शिंदे यांनी मुंबई ते नाशिक असा वंदे भारत ट्रेनने प्रवास करत पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

  • शिवसंवाद दौऱ्यातून खासदार डॉ. शिंदे महाराष्ट्र पिंजून काढणार

शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे राज्याचा दौरा करणार आहेत. मे, जून आणि जुलै असे तीन महिने खासदार डॉ. शिंदे ग्रामीण महाराष्ट्र पिंजून काढतील. यात १०० विधानसभा मतदार संघ आणि २२ जिल्ह्यांमध्ये खासदार डॉ. शिंदे यांचा शिवसंवाद दौरा असेल, असे पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात खासदार डॉ. शिंदे यांनी नाशिकमधील चार विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला ।