अमेरिकेत महाराष्ट्र दिनानिमित्त ”राजा शिवछत्रपती – देवगिरी ते रायगड” नाट्यविष्कार, शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती ।

  • अमेरिकेत महाराष्ट्र दिनानिमित्त ”राजा शिवछत्रपती – देवगिरी ते रायगड” नाट्यविष्कार, शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती ।
  • बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका आणि न्यू इंग्लंड मराठी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ।

मुंबई : अमेरिकेतील मराठी समाजाच्या सांस्कृतिक एकात्मतेला अधोरेखित करणारा महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार २ मे २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता ( बॉस्टन वेळेनुसार ) उत्साहात पार पडणार आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळ (BMM) ऑफ नॉर्थ अमेरिका आणि न्यू इंग्लंड मराठी मंडळ (NEMM) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष कार्यक्रमाला शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी अमेरिकेतील कलाकारांकडून ” राजा शिवछत्रपती – देवगिरी ते रायगड ” हा नाट्याविष्कार सादर केला जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. जगविख्यात अशा हार्वर्ड विद्यापीठाच्या हार्वर्ड केनेडी विद्यालयात ‘Strategies for Inclusive Growth’ – समावेशक विकासासाठीची धोरणे याचा अभ्याक्रम पूर्ण करत आहे. या दरम्यान खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांना बृहन्महाराष्ट्र मंडळ (BMM) ऑफ नॉर्थ अमेरिका आणि न्यू इंग्लंड मराठी मंडळ (NEMM) यांच्या वतीने या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांमध्ये महाराष्ट्राची भाषा, परंपरा आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य बृहन्महाराष्ट्र मंडळ सातत्याने करत आहे. अमेरिकेतील विविध शहरांमध्ये वर्षभर सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून परदेशात ही मराठी ओळख टिकविण्याचे मोठे काम या संस्थेमार्फत केले जाते. त्याच परंपरेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित प्रभावी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. “राजा शिवछत्रपती: देवगिरी ते रायगड” या नाटकाच्या माध्यमातून महाराजांच्या पराक्रमाचा आणि स्वराज्य स्थापनेच्या संघर्षाचा प्रेरणादायी प्रवास रंगमंचावर उभा राहणार आहे. अमेरिकेतील स्थानिक कलाकारांच्या सहभागातून साकारला जाणारा हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि अभिमानास्पद अनुभव ठरणार आहे. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती असणार आहे. मराठी संस्कृतीच्या जतनासाठी आणि जागतिक स्तरावर तिचा प्रसार करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असून, त्यांच्या सहभागामुळे परदेशातील मराठी समाजाशी नाते अधिक दृढ होणार आहे. यावेळी कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक सादरीकरणे, संगीत, नृत्य यांचाही समावेश असणार आहे. यामुळे अमेरिकेतील नव्या पिढीपर्यंत मराठी संस्कृती पोहोचवण्याचा आणि तिच्याशी त्यांचा भावनिक संबंध अधिक मजबूत करण्याचा उद्देश साध्य होणार आहे. एकंदरीतच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित हा सांस्कृतिक सोहळा केवळ एक कार्यक्रम नसून, परदेशातही मराठी अस्मिता जपण्याचा आणि पुढील पिढ्यांपर्यंत ती पोहोचवण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरणार आहे ।