पुजाऱ्याकडून चिमुरडीवर अत्याचार ।

  • पुजाऱ्याकडून चिमुरडीवर अत्याचार ।

डोंबिवली : डोंबिवली शहरात पुन्हा एकदा संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली असून गोग्रासवाडी परिसरात शेजारी राहणाऱ्या एका पुजाऱ्याने पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी आरोपी हरीष भावे याला अटक केली असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेने लहान चिमुरड्यांच्या सुरक्षेतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे । डोंबिवली पूर्वेतील परिसरात राहणारा नराधम आरोपी हरीष भावे हा घरोघरी जाऊन पूजा-अर्चा करणारा पुजारी आहे. तो पीडित कुटुंबाच्या घराशेजारी राहत असल्याने त्याचे त्या घरात येणे-जाणे होते. याच ओळखीचा गैरफायदा घेत, आई-वडील कामानिमित्त बाहेर असताना आरोपीने चिमुरडीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. घडलेला प्रकार चिमुरडीने धाडस करून आपल्या पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पालकांनी तात्काळ टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत त्वरित गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी घडलेल्या अन्य गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. डोंबिवलीत नेमकं चाललंय काय? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तीकडूनच असा प्रकार घडल्याने समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे ।