सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राजेंद्र जैन यांना राज्यसभेची संधी; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची घोषणा ।

  • सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राजेंद्र जैन यांना राज्यसभेची संधी; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची घोषणा ।

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर महायुतीतून कुणाला उमेदवारी द्यायची, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्या नावांवर राष्ट्रवादीत गेल्या दोन दिवसांपासून चर्चा झाली. परंतु अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीने विदर्भातील नेते राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राज्यसभेसाठी विदर्भाला प्रतिनिधित्व देण्याचे पक्षाच्या मनात होते. त्यानुसार सर्वंकष चर्चेनंतर आम्ही राजेंद्र जैन यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जैन यांचे नाव अंतिम झाल्याचे तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने सखोल चर्चा केली. राष्ट्रवादी पक्षाचे आणि पर्यायाने महायुतीचे उमेदवार म्हणून राजेंद्र जैन यांना पक्षाने अधिकृतपणे उमेदवारी दिली. विधानसभेमध्ये गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज संस्थेतून त्यांनी १२ वर्षे प्रतिनिधित्व केले. मध्यवर्ती बँक, फेडरेशन या संस्थेमध्ये त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. विदर्भाला संधी देण्याचे पक्षाच्या मनात होते. त्यादृष्टीने पक्षाने एकमताने निर्णय राजेंद्र जैन यांच्याबाबत घेतलेला आहे. भुजबळांचे नाव चर्चेत होते, हे खरे आहे. भुजबळ राष्ट्रवादीचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष आहेत. अजित दादांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णय प्रक्रियेतील महत्वाचे योगदान आम्हा मंडळीचे होते. तितकेच योगदान भुजबळांचे देखील होते. त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा अनुभव पक्षाला उद्याच्या दृष्टीकोनातून दिशादर्शक ठरणार आहे. त्यांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य तो सन्मान नक्की होईल. पुढच्या कालावधीसाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या वाटचालीसाठी त्या संदर्भातला निर्णय आम्ही नक्की घेऊ, असे तटकरे म्हणाले. तसेच छगन भुजबळ अजिबात नाराज नाहीत. पक्ष एकसंघपणे काम करतो आहे, असेही तटकरे म्हणाले. मी सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षाने मला तिकीट देऊन माझा सन्मान केला. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केले. तिकीट दिल्याबद्दल पक्षाचा मी आभारी आहे, अशी पहिली प्रतिक्रिया राजेंद्र जैन यांनी माध्यमांशी बोलताना दिली ।