कल्याणमध्ये ३४ कोटींचे हेरॉईन जप्त, पठाण गँग च्या मुसक्या आवळल्या; मुख्य पुरवठादारासह ५ जणांना अटक ।

  • कल्याणमध्ये ३४ कोटींचे हेरॉईन जप्त, पठाण गँग च्या मुसक्या आवळल्या; मुख्य पुरवठादारासह ५ जणांना अटक

कल्याण :  पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०३, कल्याण यांच्या अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ९ किलो ७६८ ग्रॅम वजनाचा आणि ३४ कोटी १८ लाख ८४ हजार रुपये किमतीचा हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी मुख्य पुरवठादारासह एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली आणि इतर ठिकाणी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात माल जप्त झाल्याने अंमली पदार्थ विक्री व्यापार करणाऱ्यांचे यांचे धाबे दणाणले आहेत दिनांक ०१/०४/२०२६ रोजी पोलीस उप आयुक्त, परि. ०३ यांच्या आदेशान्वये सपोनि अनिल गायकवाड, ग्रेड पोलीस उप निरीक्षक जितेंद्र ठोके यांचे पथक महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर होते. सकाळी ७:२० वाजता स्मशानभूमीजवळ, सांगळेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर दोन संशयित इसम पाठीवर बॅग घेऊन आढळले. पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जागीच ताब्यात घेण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक आयुक्त अशोक होनमाणे , महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सिंग परदेशी आणि पथकाने पत्रकार परिषदेत उपस्थित राहून माहिती दिली ।

अटक आरोपींची नावे:

१. कासिम अब्दुल सत्तार वसईकर* (३८), रा. बजाज हाऊस, शहापूर, जि. ठाणे

२. कृष्णा नागप्पा हळेमणी (३६), रा. प्रतीक्षा नगर, सायन कोळीवाडा, मुंबई

पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत दोघांकडून मोठ्या प्रमाणात हेरॉईन जप्त करण्यात आले. याप्रकरणी पो.शि. अमित शिंदे यांच्या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

घरझडतीत आणखी साठा जप्त:

तपासादरम्यान आरोपी कासिम वसईकर याच्या शहापूर येथील घराची झडती घेतली असता ५३१.६९ ग्रॅम वजनाचा, १ कोटी ८५ लाख ८५ हजार रुपये किमतीचा हेरॉईनचा साठा मिळून आला.

मुख्य पुरवठादाराच्या मुसक्या आवळल्या-

सखोल तपासात जप्त हेरॉईन मुख्य पुरवठादार अमजद युसुफ पठाण (४७), रा. बैलबाजार, कल्याण – सध्या रा. ईगतपुरी, जि. नाशिक याने आरोपी गणेशन पुथुस्वामी जंगमार उर्फ अण्णा (७१), रा. सायन कोळीवाडा यास व्यवसायासाठी पुरवले होते. कासिम वसईकर आणि त्याचा साथीदार सद्दाम गफुर शेख (३२), रा. बैलबाजार, कल्याण हे दोघे अमजदकडून माल घेऊन वितरकांपर्यंत पोहोचवत होते, असे निष्पन्न झाले.

पुढील अटका:

१. गणेशन जंगमार उर्फ अण्णा – दि. ५/४/२०२६ रोजी अटक

२. सद्दाम गफुर शेख – दि. ६/४/२०२६ रोजी अटक

३. मुख्य आरोपी अमजद युसुफ पठाण – दि. २१/५/२०२६ रोजी अटक. त्याला दि. ०१/०६/२०२६ पर्यंत १० दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

एकूण जप्ती: ९ किलो ७६८ ग्रॅम हेरॉईन

एकूण किंमत: ३४,१८,८४,०००/- रुपये,

एकूण अटक: ५ आरोपी,

या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून, अंमली पदार्थांच्या विरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे ।