- अंबरनाथमध्ये खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याकडून विकासकामांची पाहणी !
- भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी उद्यानाचे पुनर्विकास कामाची केली पाहणी ।
अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी उद्यानाचे पुनर्विकास काम पूर्ण झाले असून हे उद्यान आता नागरिकांसाठी काही दिवसांपूर्वी खुले करण्यात आले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज या उद्यानाची पाहणी करून विविध सुविधांचा आढावा घेतला. याचबरोबर अंबरनाथ पश्चिम येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रीडासंकुल तसेच पूर्व भागातील हुतात्मा चौक येथील उद्यान पुनर्विकासाच्या कामांचीही त्यांनी पाहणी केली. अंबरनाथ शहरातील शिवसेना नगरसेवक कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर यांच्या प्रभागातील अटल सूर्योदय उद्यानाचा पुनर्विकास नागरिकांच्या सूचना, स्थानिक गरजा आणि खुल्या मैदानाचे मूळ अस्तित्व कायम ठेवत अत्यंत सुयोग्य पद्धतीने करण्यात आला आहे. या उद्यानाचे नामकरण आता “भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी उद्यान” असे करण्यात आले असून, अंबरनाथकरांसाठी हे उद्यान विरंगुळा, आरोग्य आणि सामाजिक संवादाचे नवे केंद्र ठरणार आहे. उद्यानामध्ये नागरिकांना आरामदायी वातावरणात वेळ घालवता यावा यासाठी आकर्षक शेडयुक्त आसनव्यवस्था उभारण्यात आली आहे. लहान मुलांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित प्लेईंग एरिया विकसित करण्यात आला असून युवकांसाठी दोन सुसज्ज बॅडमिंटन कोर्ट तयार करण्यात आले आहेत. यासोबतच उद्यानामध्ये पारंपरिक शैलीतील मचाण उभारण्यात आले असून नागरिकांना शांत वातावरणात विरंगुळ्याचा आनंद घेता येणार आहे. अंबरनाथमधील अनेक नागरिक नियमितपणे सकाळी आणि सायंकाळी चालण्यासाठी येत असल्याने या पार्श्वभूमीवर उद्यानात अत्याधुनिक सिंथेटिक जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्यस्नेही वातावरणासोबतच नागरिकांना व्यायाम आणि फिटनेससाठी उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे. संपूर्ण उद्यानाचे नियोजन करताना खुली जागा अबाधित ठेवण्यात आली असून हरित वातावरण जपण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्यानातील सुविधांची पाहणी करताना नागरिकांसाठी अधिकाधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. शहरातील वाढती लोकसंख्या आणि बदलत्या गरजा लक्षात घेऊन अशा सार्वजनिक ठिकाणांचे जतन आणि सुशोभीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर खासदार डॉ. शिंदे यांनी अंबरनाथ पश्चिम येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रीडासंकुलाच्या कामाचीही पाहणी केली. या क्रीडा संकुलामध्ये इंडोर आणि आऊटडोर अशा दोन्ही प्रकारच्या खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून शहरातील खेळाडूंना आधुनिक दर्जाचे व्यासपीठ मिळणार आहे. क्रीडासंकुलाचे काम वेगाने सुरू असून खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा मिळतील, यासाठी उभारणी करताना आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला दिल्या. तसेच शहराच्या पूर्व भागातील हुतात्मा चौक येथे सुरू असलेल्या उद्यान पुनर्विकासाच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. या ठिकाणी कलादालन आणि खुल्या रंगमंचाची उभारणी करण्यात येत असून सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी हे ठिकाण भविष्यात महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. संबंधित कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, गटनेते तथा नगरसेवक रवींद्र करंजुले, नगरसेवक सर्वश्री राजेंद्र वाळेकर, अब्दुलभाई शेख, शैलेश भोईर, सचिन पाटील, मीरा शेलार, अल्पना गोर्हे, सुनीता बागुल, दिलीप आढाव, रोहिणी भोईर, किरण चौबे, भाजपा गटनेते तथा नगरसेवक अभिजित करंजुले, विश्वजित करंजुले, नगरसेवक निखिल चौधरी, राजेंद्र चौधरी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ।
