नगरसेवक मंदार हळबे यांना माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश ताटे यांच्याकडून कायदेशीर नोटीस ।

  • नगरसेवक मंदार हळबे यांना माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश ताटे यांच्याकडून कायदेशीर नोटीस ।

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा “ब्लॅकमेलर” उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला असून याप्रकरणी हा उल्लेख करणारे भाजपा नगरसेवक मंदार हळबे यांना माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश ताटे यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसीद्वारे हळबे यांना त्यांनी केलेल्या “ब्लॅकमेलर” या वक्तव्याचे कागदोपत्री पुराव्यासह उत्तर दयावे, अथवा सार्वजनिकरित्या लेखी माफी मागावी. अन्यथा माहिती अधिकार कार्यकर्ते व माहिती अधिकार कायद्याची बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी व दिवाणी स्वरुपाची कायदेशिर कारवाई करण्याचा इशारा गणेश ताटे यांनी दिला आहे. हळबे यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये गणेश ताटे माहिती अधिकार कार्यकर्ता असून ते समाजातील जागरुक नागरीक तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी माहिती अधिकार अंतर्गत अनेक गैरप्रकार व गैरव्यवहार उघडकीस आणले आहेत. तसेच सार्वजनिक हिताच्या विविध विषयावर कायदेशिर मार्गाने काम करीत आहेत. मंदार हळबे यांनी २५/०३/२०२६ रोजीच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत माहिती अधिकार कार्यकर्त्याना “ब्लॅकमेलर” असे संबोधले असून ब्लॅकमेलींग करणारा माहीती अधिकार ग्रुप महानगरपालिकेत असल्याचे व इतर मोघम तसेच गंभीर व बदनामीकारक आरोप केलेले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्त्यावर केलेल्या आरोपाबाबत पुरावे द्यावे, व सिध्द करावे. कोणत्या माहिती अधिकार कार्यकर्त्याने कोणत्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल केले किंवा करत आहे त्याचे नांव व पुरावे दयावे. ब्लॅकमेलिंग करणारा माहिती अधिकार ग्रुप महानगरपालिकेत सक्रीय असल्यास त्या ग्रुपचे नांव व त्या ग्रुप मधील सदस्यांची संपुर्ण नाव व ओळख पुराव्यासह जाहीर करावी. नगररचना विभागातील कोण कोणत्या अधिकाऱ्यांकडे माहिती अधिकार कार्यकर्त सातत्याने बसलेले असतात, त्या अधिकाऱ्याचे संपूर्ण नाव व हुद्दा तसेच त्या अधिकाऱ्याकडे सातत्याने बसून राहणारे माहिती अधिकार कार्यकर्त्याचे संपुर्ण नाव व त्याबाबत पुराव्यासह सिध्द करावे. माहिती अधिकार कार्यकर्ते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करत असतात त्याबाबत संबधित अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या वरीष्ठांकडे, संबंधीत विभागाकडे अथवा आपल्याकडे पुराव्यानिशी तक्रार केली असल्यास या माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याचे संपुर्ण नांव व हुद्दा तसेच पुरावे जाहिर करावे अशी मागणी गणेश ताटे यांनी केली आहे. त्यामुळे आता या कायदेशीर नोटीसला नगरसेवक मंदार हळबे काय उत्तर देतात हे पहावे लागेल. कल्याण डोंबिवली पालिकेत १० ते १५ माहिती अधिकार कार्यकर्ते पालिका प्रशासनातील विविध प्रकारची प्रकरणे बाहेर काढून धसास लावण्याचा, याप्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्नशील असतात. यामध्ये ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश ताटे हेही अशी प्रकरणे बाहेर काढून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबन, कठोर शिक्षा होतील यासाठी प्रयत्नशील असतात ।