- महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्याचा बनावट स्टीकर लावून व्हीआयपी असल्याचा दिखावा करणे एका काँग्रेस नेत्याला चांगलेच महागात पडले, आरटीओकडून 1500 रुपयांचा दंड ।
कल्याण : महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्याचा बनावट स्टीकर लावून व्हीआयपी असल्याचा दिखावा करणे एका काँग्रेस नेत्याला चांगलेच महागात पडले आहे. कल्याणमध्ये आरटीओने केलेल्या कडक कारवाईनंतर हा प्रकार चांगलाच चर्चेत आला आहे. सोमवारी केडीएमसी मुख्यालयात (MH 05 FP 5152) क्रमांकाची एक कार प्रवेश करताना आढळली. या कारवर विधानपरिषद सदस्याचा स्टीकर लावलेला होता. त्यामुळे सुरक्षारक्षकांनीही कार अडवली नाही. मात्र, एका व्यक्तीने हा स्टीकर बनावट असल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच आरटीओ अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांनी तत्काळ कारवाई करत केडीएमसी मुख्यालय परिसरात संबंधित वाहनाची तपासणी केली. तपासणीत स्पष्ट झाले की काँग्रेस नेते सुरेंद्र आढाव यांनी आपल्या खासगी वाहनावर बेकायदेशीरपणे व्हीआयपी स्टीकर लावून स्वतःला विशेष दर्जा असल्याचा दिखावा केला होता. मोटार वाहन कायद्यानुसार आरटीओने तातडीने कारवाई करत अढाव यांच्यावर 1500 रुपयांचा दंड ठोठावला आणि स्टीकर तात्काळ काढण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की भविष्यात अशी कृती पुन्हा झाल्यास वाहन जप्त केले जाईल. यावर अढाव यांनी तत्काळ स्टीकर काढून टाकल्याचे मान्य केले या कारवाईनंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे ।
