भाजपच्या सर्वोच्‍च संसदीय समितीत देवेंद्र फडणवीस यांची एंट्री? दिल्लीत चर्चांना उधाण ।

  • भाजपच्या सर्वोच्‍च संसदीय समितीत देवेंद्र फडणवीस यांची एंट्री? दिल्लीत चर्चांना उधाण ।

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्‍च आणि अत्यंत ताकदवान मानल्या जाणाऱ्या संसदीय समितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या असून त्यांच्या या संभाव्य एंट्रीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जर संसदीय समितीत फडणवीस यांची निवड झाली, तर भाजपच्या केंद्रीय संघटनाव्यवस्थेत तसेच राष्ट्रीय राजकारणात त्यांची ताकद आणखी वाढणार आहे.फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात पाठवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते इच्छुक असले, तरी आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचे फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले आहे. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असला, तरी त्यात फडणवीस यांचा समावेश न होता थेट संसदीय समितीत त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या भाजपच्या या संसदीय समितीत एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही. यापूर्वी नितीन गडकरी या समितीत होते, परंतु ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांना समितीमधून वगळण्यात आले. सध्या फडणवीस यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे, मात्र महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणून फडणवीस यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. दरम्यान, संसदीय समितीवरील निवडीच्या चर्चांबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारले असता, आपल्याला याबाबत कोणतीही कल्पना नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.