- गोंधळ’ची यशस्वी वाटचाल कायम! फिल्मफेअर अवॉर्ड मराठी 2026 मध्ये 6 मानाचे पुरस्कार ।
मुम्बई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरलेल्या ‘गोंधळ’ या चित्रपटाने फिल्मफेअर मराठी पुरस्कार 2026 मध्ये दिमाखदार कामगिरी करत 19 नामांकनांपैकी तब्बल 6 पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे, 6 पुरस्कार पटकावणारा ‘गोंधळ’ हा दुसरा सर्वाधिक गौरवप्राप्त चित्रपट ठरला आहे. प्रभावी कथा, तांत्रिक दर्जा आणि आशयघन मांडणीमुळे या चित्रपटाने समीक्षकांसह प्रेक्षकांचीही मनं जिंकली होती. आता फिल्मफेअरच्या या यशामुळे ‘गोंधळ’च्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. चंद्रशेखरदस्तऐवज ‘गोंधळ’ला सर्वोत्कृष्ट पटकथा (संतोष डावखर), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत (इल्लैयराजा), सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (अमलेंदू चौधरी), सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजन ( जयेश धाकण), सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता (निशाद भोईर), सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री – सहविजेती (इशिता देशमुख) या विभागात पुरस्कार मिळाले आहेत. याआधी इफ्फीमध्ये सिल्व्हर पिकॉक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार, फिप्रेस्को पुरस्कार, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ्फ), झी चित्र गौरव पुरस्कार आणि मटा सन्मान यांसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवलेला ‘गोंधळ’ने आता फिल्मफेअर मराठी पुरस्कारांमध्येही दमदार ठसा उमटवत मराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले, “फिल्मफेअर मराठी पुरस्कार 2026 मध्ये ‘गोंधळ’ला मिळालेला हा सन्मान आमच्या संपूर्ण टीमसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. तब्बल 19 नामांकनांमधून 6 पुरस्कार मिळणे आणि दुसरा सर्वाधिक गौरवप्राप्त चित्रपट ठरणे ही आमच्या प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि सहकाऱ्यांच्या अथक मेहनतीची पावती आहे. या प्रवासात आमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचे, चित्रपट समीक्षकांचे, माध्यमांचे आणि चित्रपटावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे मी मनःपूर्वक आभार मानतो. अशा पुरस्कारांमुळे कलाकारांना अधिक उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा मिळते. ‘गोंधळ’ पुन्हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करावा किंवा तो ओटीटीवर आणावा, अशी मागणी आमच्याकडे सातत्याने प्रेक्षकांकडून होत आहे. त्यांच्या या प्रेमाचा आम्ही नक्कीच आदर करतो. या संदर्भात आम्ही सकारात्मक चर्चा करत असून लवकरच प्रेक्षकांसाठी एक सुखद बातमी देऊ.” दरम्यान, ‘गोंधळ’ची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांचे असून, डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निशाद भोईर, अनुज प्रभू, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे यांच्यासह अनेक अनुभवी कलाकारांनी चित्रपटात प्रभावी भूमिका साकारल्या असून, आशय, अभिनय आणि तांत्रिक दर्जाच्या जोरावर ‘गोंधळ’ने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे ।
