“खड्डे भरा” आंदोलनाद्वारे केडीएमसीच्या कारभारावर काँग्रेसचा घणाघात ।

  • “खड्डे भरा” आंदोलनाद्वारे केडीएमसीच्या कारभारावर काँग्रेसचा घणाघात ।

कल्याण : कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शहरातील रस्त्यांवरील भीषण खड्ड्यांच्या निषेधार्थ “खड्डे भरा” आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. नविन सिंग यांनी केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अॅड. नविन सिंग यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहरातील खड्डे आणि ब्लॉक होल भरण्यासाठी तब्बल ₹२५ कोटी ७० लाखांचा निविदा (टेंडर) काढला आहे. मग हे पैसे नेमके कुठे गेले? कोणत्या कामांवर खर्च करण्यात आले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.ते पुढे म्हणाले की, शहरातील प्रमुख रस्त्यांवर आजही मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, वाहनांचे नुकसान होत आहे आणि अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जर इतका मोठा निधी खर्च झाला असेल, तर त्याचे प्रत्यक्ष काम शहरात का दिसत नाही? यावेळी अॅड. नविन सिंग यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आणि महापौर यांनाही थेट इशारा देत सांगितले की, पुढील ७ दिवसांच्या आत कल्याण-डोंबिवली शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरावेत. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणावर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल आणि या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल. अॅड. नविन सिंग यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, हा प्रकार कल्याणच्या जनतेच्या पैशांचा गैरवापर असून जनतेशी झालेला मोठा विश्वासघात आहे, असा आरोप त्यांनी केला. या आंदोलनात सलीम शेख, सत्यभामा जयसवार, रीना खांडेकर, वर्षा रसाल, अजीत सिंह, अमोल गायकवाड, इमरान शेख, रंजित दांगले, आजम शेख, सुभाष सिंह, सुशील उपाध्याय, मोहन गुप्ता, वजाहत खान, चेतन भंडारी, विमलेश शर्मा, वैभव पाठक, श्रेयस सिंह, किशोर मढवी, फिरोज शेख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. सर्वांनी एकमुखाने खड्डेमुक्त कल्याणची मागणी करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली ।