दोन्ही राष्ट्रवादीतील गाठीभेटींमुळ राजकीय चर्चांना उधाण; शरद पवारांचा विलिनीकरणाला नकार ।

  • दोन्ही राष्ट्रवादीतील गाठीभेटींमुळ राजकीय चर्चांना उधाण; शरद पवारांचा विलिनीकरणाला नकार ।

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या अचानक वाढलेल्या गाठीभेटींमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींच्या चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तसेच भाजप आणि एनडीएच्या धुरंधरांमध्ये गेल्या काही दिवसांत लागोपाठ झालेल्या भेटींमुळे दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार किंवा शरद पवार यांचा गट एनडीएमध्ये सहभागी होणार का, याबद्दल विविध अटकळी बांधल्या जात आहेत. या राजकीय घडामोडींची सुरुवात जुलैच्या मध्यात झाली. १४ जुलै रोजी जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर एकत्र दिसले. त्यानंतर लगेचच १५ जुलैला जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भेटींचा हा सिलसिला पुढे चालूच राहिला; २२ जुलैला स्वतः शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर दुसऱ्याच दिवशी पार्थ पवार व प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. राजकीय नाट्य इथेच थांबले नाही, तर २७ जुलै रोजी सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यांच्या पाठोपाठ लगेचच सुनील तटकरेही अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले. एकापाठोपाठ झालेल्या या भेटींमुळे दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या असल्या तरी शरद पवार यांनी विलिनीकरणाच्या किंवा एनडीएमध्ये जाण्याच्या सर्व शक्यता ठामपणे फेटाळून लावल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा सध्यातरी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार सुप्रिया सुळे यांनी या सर्व भेटींमागे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे आणि वैयक्तिक कार्यक्रमांची निमंत्रणे देणे हीच कारणे असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी शरद पवार आणि त्यांचा पक्ष कधीही एनडीएच्या विचारांसोबत जाणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. तर महायुतीतील नेत्यांनी आणि दत्ता भरणे यांनी पार्थ पवार व प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांचे मार्गदर्शन घेण्यात काहीही चुकीचे नसल्याची भूमिका मांडली आहे. या घडामोडींवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी शरद पवार कधीही भाजपासोबत जाणार नाहीत असा दावा केला, ज्यावर भाजपने राऊत यांच्यावर पलटवार करत टीका केली आहे. नेत्यांनी या भेटी वैयक्तिक किंवा कामाच्या स्वरूपाच्या असल्याचे सांगितले असले तरी, ज्या प्रकारे दोन्ही गटाचे नेते एकामागून एक केंद्रीय नेतृत्वाला भेटत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे नक्की काय शिजतंय, असा प्रश्न उपस्थित होत आहे ।