केडीएमसी स्थायी समितीचे सभापती मल्लेश शेट्टी यांचे धाडसी निर्णय, आरोग्य, शिक्षण व अग्निशमन विभागासाठी महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर ।

  • केडीएमसी स्थायी समितीचे सभापती मल्लेश शेट्टी यांचे धाडसी निर्णय, आरोग्य, शिक्षण व अग्निशमन विभागासाठी महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर ।

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीची विशेष सभा २७ जुलै २०२६ रोजी पालिका भवनात दुपारी ३ ते ६ या वेळेत पार पडली. स्थायी समितीचे सभापती मल्लेश शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आरोग्य, शिक्षण, अग्निशमन आणि नागरी सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. नागरिकांच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या विषयांवर तातडीने निर्णय घेतल्यामुळे या बैठकीकडे विशेष लक्ष लागले होते. सभा क्रमांक ७ अंतर्गत एकूण १५ विषयपत्रिकांवरील प्रस्तावांवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रत्येक विषयाचा सर्वंकष आढावा घेतल्यानंतर आवश्यक त्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. आरोग्य विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयांसाठी डॉक्टर, स्टाफ नर्स, फार्मसिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच ईसीजी तंत्रज्ञ या पदांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास मंजुरी देण्यात आली. याशिवाय २० बीएएमएस वैद्यकीय अधिकारी आणि एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठीही निविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पालिका रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षण विभागाच्या प्रस्तावालाही हिरवा कंदील देत महानगरपालिका शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय शालेय वह्यांचे वितरण करण्यासाठी निविदा काढण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना वेळेत शैक्षणिक साहित्य उपलब्ध होण्यास मदत होणार असून पालकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. अग्निशमन विभाग अधिक सक्षम करण्यासाठी दोन अत्याधुनिक वॉटर टेंडर अग्निशमन वाहनांच्या खरेदीचा प्रस्तावही चर्चेनंतर मंजूर करण्यात आला. शहराची वाढती लोकसंख्या, उंच इमारती आणि वाढते नागरीकरण लक्षात घेता अग्निशमन दलाचे बळकटीकरण आवश्यक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. बैठकीदरम्यान स्थायी समितीचे सदस्य मंदार हळवे आणि दीपेश म्हात्रे यांनी विविध विकासकामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. रखडलेले रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणातील विलंबाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळाल्याच पाहिजेत, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने आणि तत्परतेने काम करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या. सभापती मल्लेश शेट्टी यांनीही विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत नागरिकांच्या हिताशी संबंधित कोणत्याही कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत अधिकाऱ्यांना कामात गती आणण्याचे निर्देश दिले. विकासकामांचा दर्जा, पारदर्शकता आणि वेळेत अंमलबजावणी यावर विशेष भर देण्याचे आदेश त्यांनी दिल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली. आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे, विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, अग्निशमन यंत्रणा मजबूत करणे आणि प्रशासनाला उत्तरदायी बनविण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेले निर्णय महत्त्वाचे मानले जात आहेत. नागरिकांच्या प्रश्नांबाबत ठाम भूमिका घेत कामातील दिरंगाईवर अधिकाऱ्यांना सुनावल्यामुळे सभापती मल्लेश शेट्टी यांच्या कार्यपद्धतीची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा होत असून त्यांच्या निर्णयक्षम नेतृत्वाचे अनेक स्तरांतून कौतुक व्यक्त केले जात आहे ।