कल्याण-डोंबिवलीतील हॉटेल, रेस्टॉरंट्स, धाबे आणि क्लाउड किचन चालकांसाठी नियमावली जारी ,प्रशासनाने व्यावसायिकांना तीन दिवसांचा अल्टिमेटम ।

  • कल्याण-डोंबिवलीतील हॉटेल, रेस्टॉरंट्स, धाबे आणि क्लाउड किचन चालकांसाठी नियमावली जारी ,प्रशासनाने व्यावसायिकांना तीन दिवसांचा अल्टिमेटम ।

डोंबिवली : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली आता राज्यभर ‘SAFE FOOD, HEALTHY MAHARASHTRA’ मोहीम धडाक्यात सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून, कल्याण-डोंबिवलीतील हॉटेल, रेस्टॉरंट्स, धाबे आणि क्लाउड किचन चालकांसाठी नियमावली जारी करण्यात आली असून, प्रशासनाने व्यावसायिकांना तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. कल्याण-डोंबिवली विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत देशमुख यांनी हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, स्वच्छता राखणे, अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे आणि परवान्यांचे नूतनीकरण करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. जर या नियमांची तीन दिवसांत काटेकोर अंमलबजावणी झाली नाही, तर संबंधित आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. या मोहिमेबाबत अधिक माहिती देताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. हॉटेल आणि उपाहारगृहांनी अन्न तयार करण्याची प्रक्रिया, पॅकेजिंग आणि सुरक्षित पाण्याचा वापर यांबाबतच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. कारवाईदरम्यान गंभीर त्रुटी जसे की अस्वच्छता, तेलाचा पुनर्वापर आणि तापमानातील त्रुटी आढळल्यास कडक पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या या भूमिकेचे हॉटेल व्यावसायिकांनी स्वागत केले असून, आवश्यक सुधारणा तीन दिवसांत पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे ।