गुटखा माफियांच्या विरोधात थेट मकोका अंतर्गत कारवाई करावी, असे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले ।

  • गुटखा माफियांच्या विरोधात थेट मकोका अंतर्गत कारवाई करावी, असे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले ।

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दोन महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली. राज्यात गुटखा आणि तंबाखू सारख्या आरोग्याला घातक असणाऱ्या पदार्थांवर बंदी आहे. पण तरीही गुटखा, तंबाखू यांचे उत्पादन करणाऱ्या, साठवणूक करणाऱ्या आणि वितरित करणाऱ्याचे प्रकार सर्रासपणे बघायला मिळतात. पण आता अशा गुटखा माफियांच्या विरोधात थेट मकोका अंतर्गत कारवाई करावी, असे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. तसेच रुग्णालयाच्या मेडिकलमध्येच औषधी घेणे बंधनकारक नसेल, रुग्णाचे नातेवाईक कुठेही औषध खरेदी करु शकतात, असादेखील आदेश तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. यावेळी तुकाराम मुंढे यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. तुकाराम मुंढे यांना पत्रकारांनी एका व्हायरल क्लिपचा मुद्दा मांडत आपल्याला कुणाकडून धमकी आली आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी नाही, असं उत्तर दिलं. “मला धमकी आलेली असं तुम्हाला कुणी सांगितलं? नाही. ती जुनी क्लिप आहे. कमीत कमी दहा वर्षांपूर्वीची क्लिप आहे. ती आताची क्लिप नाहीय. मला आठवत नाही, बहुतेक ती पुण्यातील क्लिप आहे. मला अशी धमकी आलेली नाही”, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, एका ठिकाणी एफडीएची कारवाई कारवाई करायला गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या घटनेवरही तुकाराम मुंढे यांनी प्रतिक्रिया दिली. “हल्ला झाल्याप्रकरणात तातडीने कारवाई झाली. आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं. मी डीजीपींसोबत चर्चा केली. त्यांनी तातडीने कारवाई केली. अशाप्रकारच्या हल्ल्यांना आम्ही घाबरणार नाहीत. आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सुरक्षा देऊ. जे कायदा हातात घेतील त्यांना कायद्याची ताकद दाखवली जाईल”, अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी दिली. “डेअरी प्रोडक्ट्सच्या उत्पादकांची आणि डेअरी मालकांची बैठक आज बोलावली होती. डेअरी सेक्टरमध्ये अत्यंत चांगले काम करणारी लोकं आहेत. पण काही चुकीचे काम करणारे आहेत. दुग्धजन्य पदार्थ बनवताना सर्व नियम पाळावेत या दृष्टीकोनातून बैठक बोलावली होती. कायदा काय आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत ते आम्ही समजून घेतले. इथून पुढे गावातील कलेक्शन सेंटरपासून ते कंपनी, तिथून विक्रेत्यांपर्यंत वस्तू जाईल तोपर्यंत काय-काय काळजी घ्यावी, याबाबत माहिती दिली. त्यांनी देखील नियम पाळण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच कायद्यानुसार जिथे बदल करायचे आहेत ते करु, असं त्यांनी आश्वासन दिलं”, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली. “आमच्याकडे बऱ्याचदा तक्रारी येतात. माहिती मिळते की, एखाद्या रुग्णालयात रुग्ण दाखल असेल तर त्याला त्याच रुग्णालयाच्या मेडिकलमधून औषधी घेण्याचा हट्ट केला जातो. पण कायद्यानुसार, रुग्णालयाच्या मेडिकलमधूनच औषधी घ्यावेत का? याबाबत कोणतेही बंधने नाहीत. औषधी कुठेही घेता येऊ शकतात. याबाबतचे आदेश आम्ही जारी केले आहेत. तुम्ही कोणत्याही रुग्णाला कुठल्या मेडिकलमधून औषधी घ्यायचे यासाठी दबाव टाकू शकत नाहीत. कारण तो रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांचा अधिकार आहे”, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं ।