सोनोग्राफीसाठी ४०० ऐवजी ८०० ते ९०० रुपये घेऊन कंत्राटदाराकडून लूट सुरू आहे : भाजप नगरसेविका उपेक्षा भोईर
कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेचे टिटवाळ्यात रुक्मिणी प्लाझा हे प्रसूतिगृह आहे. हे प्रसूतिगृह कंत्राटदारामार्फत चालविले जाते. तेथे सोनोग्राफीसाठी ४०० ऐवजी ८०० ते ९०० रुपये घेऊन कंत्राटदाराकडून लूट सुरू आहे, असा गंभीर आरोप भाजप नगरसेविका तथा माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी केला आहे. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नगरसेविका भोईर यांनी हा आरोप केला. खासगी कंत्राटदाराकडून अशा प्रकारे लूट केली जात असल्यास त्याची चौकशी करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक मंदार हळबे यांनी केली. त्यावर सभापती मल्लेश शेट्टी यांनी चौकशी करून अहवाल पुढील सभेत ठेवण्याचा आदेश दिला. रुक्मिणी प्लाझा या प्रसूतिगृहात वेस्टर्न हेल्थ कन्सल्टन्सी या कंपनीला रोज ३ हजार रुपये दराने मनुष्यबळ पुरविणे, प्रयोगशाळेत तपासण्या करणे, सोनोग्राफीसाठी ४०० रुपये आकारणे या कामासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा विषय समितीसमोर आला होता. निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने हा विषय मंजुरीसाठी ठेवला होता. त्याला नगरसेविका भोईर यांनी आक्षेप घेतला आहे. गर्भवतींसाठी पहिल्या दोन सोनोग्राफी या मोफत आणि त्यानंतर करण्यात येणारी सोनोग्राफी यासाठी ४०० रुपये आकारले पाहिजेत. मात्र कंत्राटदार सरसकट जास्तीचे पैसे उकळत असल्याचा आरोप भोईर यांनी केला. आर्थिक फटका उपचारासाठी आलेल्या सर्वसामान्य महिलांना बसत आहे, याकडे नगरसेवक हळबे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे हा विषय स्थगित ठेवण्यात आला. सोनोग्राफीसाठी ४०० ऐवजी ८०० ते ९०० रुपये आकारले जातात. या प्रसूतिगृहात पालिका हद्दीसह ग्रामीण भागातील महिलाही उपचारासाठी येतात. महापालिका हद्दीबाहेरील ग्रामीण भागातील महिलांकडून सोनोग्राफीकरिता २४०० रुपये आकारले जातात. याबाबत आरोग्य खात्याचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी माहिती दिली की, टिटवाळ्यातील प्रसूतिगृह हे ५० बेड क्षमतेचे आहे. त्याठिकाणी वर्षभरात ३७१ महिलांची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाली. तर नैसर्गिकरित्या ८१७ महिलांची प्रसूती झाली आहे. ३ हजार २२९ महिलांनी 3 सोनोग्राफीचा लाभ घेतला आहे. गरोदर महिलांच्या पहिल्या दोन सोनोग्राफीचे प्रत्येकी ४०० रुपये याप्रमाणे एकूण ८०० रुपये हे महापालिका कंत्राटदाराला देते. त्यानंतरच्या सोनोग्राफीकरिता ४०० रुपये सीएसआर दरानुसार ३ घेतले गेले पाहिजेत. मात्र कंत्राटदाराकडून जास्तीचे पैसे घेतले जात असल्यास ही गंभीर बाब आहे. या प्रकरणी चौकशी करून त्याचा अहवाल स्थायी समितीसमोर ठेवला जाईल, असे आश्वासन दिले ।
