खुनाच्या गुन्हयात अडीच वर्षापासून फरार आरोपीला विष्णुनगर पोलीसांकडून अटक ।

  • खुनाच्या गुन्हयात अडीच वर्षापासून फरार आरोपीला विष्णुनगर पोलीसांकडून अटक ।

डोंबिवली : २७/११/२०२३ रोजी विष्णुनगर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील देविचापाडा येथे एका ४० ते ४५ वयाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह ठिकठिकाणी जखमा असलेल्या स्थितीत मिळून आला होता. मृतक अनोळखी असल्याने या प्रकरणी देविचापाडा येथील पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी दिलेल्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ४ पोलीस पथके तयार केली होती, या पथकांनी आजुबाजूच्या परिसरातील सर्व सि.सी.टी.व्ही. फुटेजची पडताळणी केली तसेच स्थानिक पातळीवर माहिती प्राप्त करून मृतकाची ओळख पटविली होती, त्याचप्रमाणे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने (१) विलन ठावरे वय- ४१ वर्षे, रा. उमेशनगर, २) योगेश डोंगरे वय ४२ वर्षे, लोटेवाडी, मोठागाव यांच्याकडे तपास करता त्यांनी त्याचा साथीदार दिपक करकडे रा. रेतीबंदर मोठागांव, याच्यासह मयत इसम सोमनाथ शिंदे यास किरकोळ करणावरून डोक्यात दगडाने मारहाण करून त्यास जिवे ठार मारल्याचे कबूल केले होते. या दोन्ही आरोपींना गुन्हयात अटक करून त्यांच्या विरोधात सबळ पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी दिपक करकडे हा गुन्हा केल्यापासून अटकेच्या भितीने परागंदा होऊन आपले अस्तित्व लपवून वास्तव्य करीत होता. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पथक सुमारे अडीच वर्षापासून या आरोपीच्या मागावर होते, परंतु आरोपी हा त्याच्या वास्तव्याची ठिकाणे वारंवार बदलून पोलीसांना गुंगारा देत होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णुनगर पोलीस ठाणे, राम चोपडे, पोलीस निरीक्षक गुन्हे जी.एस.गमे, सहा. पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, सपोउनि. शकील जमादार, पोहवा भोसले, पोशि रायसिंग, सपोउनि. सुनिल पवार नेम. मानपाडा पोलीस ठाणे यांनी सातत्याने बातमीदारांच्या संपर्कात राहुन, पाठपुरावा करून बातमीदाराच्या मार्फतीने माहिती प्राप्त करून तसेच प्राप्त मोबाईल क्रमांकांचे तांत्रीक विश्लेषण करीत होते. त्यानंतर प्राप्त माहितीच्या अनुषंगाने सपोनि. सचिन लोखंडे व पथकाने दिनांक २४/४/२०२६ रोजी वेशांतर करून, वाटेगाव, नांदेड जिल्हा येथे सापळा रचून अडीच वर्षापासून फरार असलेला खुनाच्या गुन्हयातील आरोपी दिपक करकडे, वय २८ वर्षे, मुळ राहणार-पेगर गव्हाण, ता.जि. परभणी यास नांदेडच्या वाटेगाव परिसरातून शिताफीने ताब्यात घेऊन अटक केलेली आहे ।