- गोरेगाव ड्रग्स पार्टीचे कल्याण कनेक्शन ।
कल्याण : गोरेगावमधील नेक्सो सेंटर येथे झालेल्या ड्रग्स पार्टीत ओव्हरडोसने दोन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट कल्याणपर्यंत पोहोचले असून, ड्रग्स पुरवणाऱ्या मुख्य संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. गोरेगाव येथील नेक्सो सेंटरमध्ये झालेल्या ड्रग्स पार्टीत दोन जणांचा ओव्हरडोसने मृत्यू झाल्यानंतर मुंबईतील वनराई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान या पार्टीत ड्रग्स पुरवणाऱ्या तरुणाचा ठावठिकाणा कल्याणमध्ये असल्याची माहिती समोर आली. यानुसार कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी पहाटे साडे पाचच्या सुमारास वायले नगर परिसरातील मोहन हाइट्स इमारतीत छापा टाकला. येथे राहणारा आनंद पटेल हा आरोपी पोलिसांना दरवाजा उघडत नव्हता. पोलिसांनी दरवाजा तोडण्याची तयारी सुरू करताच त्याने दरवाजा उघडला. यानंतर पोलिसांनी तत्काळ आनंद पटेल याला ताब्यात घेत अटक केली आणि पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. या आरोपीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स कुठून आले, याचा तपास आता वनराई पोलीस करत आहेत. या घटनेमुळे गोरेगाव ड्रग्स पार्टीचे कल्याण कनेक्शन समोर आले असून स्थानिक पोलिसही सतर्क झाले आहेत ।
