- कल्याण–अहिल्याबाई मार्गावर मृत्यूचा सापळा; रायते येथे भीषण अपघातात ११ जण जागीच ठार, प्रवासी इको गाडीतील ,सहा पुरुष तर पाच महिलांचा समावेश ।
कल्याण : कल्याण तालुक्यातील कल्याण–मुरबाड अहिल्याबाई मार्गावर रायते परिसरात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला असून ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये ३ महिला आणि ८ पुरुषांचा समावेश असून, यामध्ये २ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह मुरबाड तहसीलदार कार्यालयातील क्लार्क भुषण घोरपडे यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, इको प्रवासी गाडीत प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर महाभीषण अपघात आघाडीला यात ११ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला . कल्याणहून मुरबाडकडे जाणारी प्रवासी इको गाडी आणि समोरून येणारे दुसरे वाहन हायवा यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी प्रचंड होती की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताचा आवाज दूरवर ऐकू गेल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दृश्य इतके भयावह होते की अनेकांचा थरकाप उडाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. रक्तबंबाळ अवस्थेत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन पथकांना मोठे प्रयत्न करावे लागले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, तर मृतदेह बाहेर काढण्याचे काम दीर्घकाळ सुरू होते. काही जखमींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.या भीषण अपघातामुळे कल्याण–मुरबाड मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी बंदोबस्त वाढवून वाहतूक वळवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणत मार्ग हळूहळू सुरळीत करण्यात आला. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वेग आणि निष्काळजीपणा हे प्राथमिक कारण असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
अवैध प्रवासी वाहतूक आणि पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, या अपघातानंतर कल्याण ग्रामीण भागातील अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कल्याण–मुरबाड मार्गावर बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या इकोसारख्या वाहनांचा मोठ्या प्रमाणात वावर असून, त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याबाबत नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. विशेषतः कल्याण ग्रामीण वाहतूक बीटच्या कामकाजावर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवैध वाहतूक सुरू असताना देखील त्याकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही ठिकाणी अशा बेकायदेशीर वाहतुकीला पोलिसांच्या कथित ‘हप्ते प्रथे’चे संरक्षण असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या असून, या व्यवस्थेचा बळी निष्पाप प्रवाशांना ठरावे लागत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.ग्रामीण भागात चिरीमिरी साठी शासकीय यंत्रणा राबत असल्याने नियमांचे मालन योग्य पद्धतीने होताना दिसत नाही , त्यामुळे अशी भीषण अपघात होताना दिसतात, पार्श्वभूमीवर, संबंधित यंत्रणांनी केवळ तपासापुरते मर्यादित न राहता अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
अपघातात मृत झालेल्यांची नावे :
प्रशांत उर्फ बबलू रुपेश चंदने – वय २१वर्ष – देवगाव, मुरबाड, भूषण घोरपडे – वय ५९ वर्ष – अंधेरी, मुंबई, जिजा गोविंदा केंबारी – वय ५० वर्ष – टेंभरे, मुरबाड ,अनंता पवार – साखरे, मुरबाड ,दीपक गवळी – कल्याण, गणपत जैनू मधे – वय ३२ वर्ष – देवराळवाडी, मुरबाड,स्नेहा मोहपे – वय अंदाजे २२ वर्ष – नारायणगाव, मुरबाड,मानसी मोहपे – वय अंदाजे २० वर्ष – नारायणगाव, मुरबाड,प्रथमेश मोहपे – वय अंदाजे १७वर्ष – नारायणगाव, मुरबाड बाकी दोघांची ओळख पटविणे सुरू आहे ।
