- कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा नागरी सत्कार होणार ।
- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत सर्वानुमते ठराव मंजूर ।
प्रमोद कुमार
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांत झालेल्या मोठ्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा नागरी सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत महायुतीच्या नगरसेवकांनी यासंदर्भातील प्रस्ताव मांडला असून तो आज सर्वानुमते मंजूर करण्यात आला. गेल्या दशकभरात कल्याण लोकसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा आणि नागरी विकासाच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना मिळाली आहे. मेट्रो, सिमेंट काँक्रीट रस्ते, रिंग रोड, उड्डाणपूल यांसारख्या मोठ्या प्रकल्पांसह विविध नागरी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतल्याची भावना महासभेत व्यक्त करण्यात आली. या कामांमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था, नागरी सुविधा आणि एकूणच विकास प्रक्रियेला गती मिळाल्याचे नगरसेवकांनी नमूद केले. महासभेत शिवसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे आणि उपमहापौर राहुल दामले यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामगिरीचा गौरव केला. या प्रस्तावाला शिवसेना तसेच भाजपच्या नगरसेवकांनीही उत्स्फूर्त पाठिंबा दिला. सभागृहातील अनेक सदस्यांनी चर्चा करताना कल्याण लोकसभेत झालेल्या विविध विकासकामांचा उल्लेख करत खासदार शिंदे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. शिवसेनेचे नगरसेवक सचिन पोटे, विश्वनाथ राणे, अस्मिता मोरे, माया कांबळे यांच्यासह भाजपचे नगरसेवक वरुण पाटील, मंदार हळबे, दिपेश म्हात्रे आणि दया गायकवाड यांनी अभिनंदन प्रस्तावाला अनुमोदन देत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले. दरम्यान, कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे वरिष्ठ नगरसेवक निलेश शिंदे यांनी सभागृहात बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नागरी सत्काराची सूचना मांडली. या सूचनेचे सभागृहातील सर्व सदस्यांनी स्वागत केले. त्यानंतर महापौर ॲड. हर्षाली थविल-चौधरी आणि उपमहापौर राहुल दामले यांनीही समर्थन देत नागरी सत्काराचा ठराव अधिकृतरीत्या मंजूर केला. या ठरावामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा लवकरच नागरी सत्कार करण्यात येणार आहे ।
