ठाणे शहराच्या मलनिस्सारण व्यवस्थेला मोठी चालना; ३०२.३८ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

  • ठाणे शहराच्या मलनिस्सारण व्यवस्थेला मोठी चालना; ३०२.३८ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
  • खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
  • कल्याण लोकसभेतील कळवा, विटावा, खारेगाव, मुंब्रा-कौसा परिसरातील मलनिस्सारण व्यवस्थेला मिळणार बळकटी
  • अमृत २.० अंतर्गत प्रकल्पाला मंजुरी; १२ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

ठाणे : ठाणे शहराच्या वाढत्या विस्तारासोबत सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ३०२.३८ कोटी रुपयांच्या मलनिस्सारण प्रकल्प मंजूर झाला आहे. केंद्र शासनाच्या शिखर समितीसह राज्य शासनाने या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी दिली असून, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी नागरी पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे मोठे यश मिळाले आहे. विशेषतः कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा, विटावा, खारेगाव, मुंब्रा आणि कौसा या परिसरातील मलनिस्सारण व्यवस्थेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र पुरस्कृत ‘अमृत २.०’ अभियानाची अंमलबजावणी १४ जुलै २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार करण्यात येत असून, या अभियानात पाणीपुरवठा, मलनिस्सारण, सरोवरांचे पुनरुज्जीवन आणि हरित क्षेत्र विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांचा समावेश आहे. राज्याच्या एकूण २९ हजार ७४२ कोटी रुपयांच्या राज्य जलकृती आराखड्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. याच अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मलनिस्सारण व्यवस्थेसाठी ३०२.३८ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून, हे काम १२ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. ठाणे शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील मलनिस्सारणाची गरज पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. विद्यमान मलवाहिन्यांमध्ये असलेले गॅप दूर करणे, विविध विकासकामांमुळे बाधित झालेल्या मलवाहिन्या स्थलांतरित करणे आणि ज्या भागांमध्ये अद्याप मलवाहिन्यांची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी नव्याने मलवाहिन्या टाकणे, अशी महत्त्वाची कामे या प्रकल्पातून करण्यात येणार आहेत. यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी विशेष महत्त्वाची बाब म्हणजे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील भूमिगत गटार योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मतदारसंघातील महत्त्वाच्या भागांचा समावेश आहे. कळवा, विटावा, खारेगाव, माजिवडा, मानपाडा आणि वर्तकनगरचा काही भाग टप्पा क्रमांक २ मध्ये येतो, तर मुंब्रा आणि कौसा परिसराचा समावेश टप्पा क्रमांक ३ मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पातून कल्याण लोकसभा मतदारसंघातील मोठ्या नागरी भागाच्या मलनिस्सारण व्यवस्थेला आवश्यक ती पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामध्ये ओपन कट पद्धतीने सुमारे २६ हजार ९७५ मीटर लांबीच्या मलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ट्रेंचलेस तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे १९ हजार ५७० मीटर लांबीच्या मलवाहिन्या उभारण्यात येणार आहेत. चार मलउच्चलन केंद्रे, सांडपाणी संकलन व्यवस्था, मुख्य मलवाहिनी आणि ऑक्झिलरी पंपिंग स्टेशन उभारण्याचाही या प्रकल्पात समावेश आहे. त्यामुळे सांडपाणी संकलन, वाहतूक आणि मलनिस्सारणाची संपूर्ण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा, विटावा, खारेगाव, मुंब्रा आणि कौसा हे भाग गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित होत आहेत. वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि त्यानुसार निर्माण होणाऱ्या नागरी सुविधांच्या गरजा लक्षात घेता या भागांमध्ये सक्षम मलनिस्सारण व्यवस्था उभारणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रकल्पामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विद्यमान व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासोबतच भविष्यातील वाढत्या गरजांचा विचार करून पायाभूत सुविधा उभारल्या जाणार असल्याने या भागाच्या नागरी विकासालाही त्याचा फायदा होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि इतर मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी आणि मंजुरी मिळवून देण्यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे. त्याच अनुषंगाने कळवा, विटावा, खारेगाव, मुंब्रा-कौसा या भागांसह कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देण्यात येत आहे. ३०२.३८ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मिळालेली मंजुरी ही त्याच पाठपुराव्याचा महत्त्वाचा परिणाम आहे. या प्रकल्पामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विद्यमान मलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटी दूर होण्यासोबतच नव्याने विकसित होत असलेल्या भागांमध्ये मलवाहिन्यांचे जाळे निर्माण होणार आहे. विशेषतः कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा-विटावा-खारेगाव आणि मुंब्रा-कौसा परिसरातील मलनिस्सारण व्यवस्थेला यामुळे बळकटी मिळणार आहे. सांडपाणी संकलन आणि वाहतुकीची व्यवस्था सक्षम झाल्याने स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा होण्यासोबतच भविष्यातील नागरी विस्तारासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा आधारही निर्माण होणार आहे. या भूमिगत गटार योजना सन २०३६ मधील प्रक्षेपित लोकसंख्या लक्षात घेऊन संकल्पित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प केवळ सध्याच्या समस्या सोडविण्यापुरता मर्यादित नसून, पुढील अनेक वर्षांतील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन मलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे ।