कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा ।

  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा ।
  • तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा जागर; दत्तनगर येथे १५० फूट उंच राष्ट्रध्वजाचे दिमाखात ध्वजारोहण 
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज विविध ठिकाणी देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहण व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी सर्वप्रथम कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर अॅड. सौ. हर्षाली विजय चौधरी (थविल) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयुक्त अभिनव गोयल (भा.प्र.से.) यांच्यासह महानगरपालिका पद धिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. यानंतर डोंबिवली पूर्व येथील जुन्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या प्रांगणातील उप महापौर राहुल दामले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या वेळी देखील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच कॅ. विनयकुमार सचान स्मारक आणि प्रेरणा वॉर मेमोरियल (शहीद स्मारक) येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी , आयुक्त अभिनव गोयल व इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्प चक्र वाहून अभिवादन करण्यात आले. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व इतर सामाजिक स्वंस्थांच्या वतीने कॅ. विनयकुमार सचान स्मारकापासून दत्तनगर चौक पर्यंत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये विद्यार्थी, नागरिक आणि विविध घटकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेत हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत परिसरात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. या तिरंगा रॅलीचा समारोप दत्तनगर चौक, डोंबिवली पूर्व येथे झाला. येथे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या १५० फूट उंच राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ,महापौर अॅड. हर्षाली विजय चौधरी (थविल), आयुक्त अभिनव गोयल (भा.प्र.से.), पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, महापालिकेतील पदाधिकारी, पालिका सदस्य/ सदस्या यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारताच्या ८०व्या स्वातंत्रदिनी आयोजित या विविध कार्यक्रमांमुळे कल्याण-डोंबिवली परिसरात देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि नागरिकांच्या सहभागाचे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. विशेषतः विद्यार्थी व नागरिकांच्या मोठ्या सहभागातून निघालेली तिरंगा रॅली आणि दत्तनगर येथे फडकविण्यात आलेला १५० फूट उंच राष्ट्रध्वज हे आजच्या स्वातंत्र्यदिनाचे प्रमुख आकर्षण ठरले ।