ठाणे जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होणार

  • ठाणे जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होणार
  • मुख्य शासकीय समारंभाची वेळ व मार्गदर्शक सूचना जारी

ठाणे : भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शनिवार,दि.15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 9:05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न होणार आहे.  या मुख्य शासकीय समारंभात उपमुख्यमंत्री, नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री, ठाणे जिल्हा, श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल.ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आवाहन केले असून, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्थानिक संस्था, शासन अंगिकृत संस्थांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी, तसेच स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर व्यक्ती आणि इतर नागरिकांनी या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नमूद करण्यात आले आहे. मुख्य शासकीय समारंभास अधिकाधिक नागरिकांना व अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यात यावे, यासाठी 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8:35 ते 9:35 या वेळेत इतर कोणतीही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालये/संस्थांनी ध्वजारोहण किंवा इतर समारंभ आयोजित करू नयेत. एखाद्या संस्थेला किंवा कार्यालयाला स्वतंत्रपणे ध्वजारोहण करावयाचे असल्यास त्यांनी सकाळी 8:35 पूर्वी अथवा सकाळी 9:35 नंतर तो कार्यक्रम पार पाडावा, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत ।