- डॉक्टर मारहाण प्रकरण नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर ।
- महाराष्ट्राबाहेर राहण्याची आणि पासपोर्ट जमा करण्याची कडक अट; आधारवाडी कारागृहातून लवकरच सुटका
कल्याण : डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने म्हात्रे यांना अनेक कडक अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला असून, त्यांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. न्यायालयाचा सविस्तर लेखी आदेश आज जारी होण्याची शक्यता आहे. जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने म्हात्रे यांच्यावर अत्यंत कठोर निर्बंध लादले असून त्यांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस आरोपपत्र दाखल करेपर्यंत रमेश म्हात्रे यांना महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर राहावे लागणार आहे. म्हात्रे महाराष्ट्राबाहेर ज्या राज्यात वास्तव्यास असतील, तेथील संबंधित पोलीस ठाण्यात त्यांना दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी नियमित हजेरी लावावी लागेल. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत प्रत्येक बुधवारी संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत पीडित डॉक्टर अथवा कोणत्याही साक्षीदाराशी प्रत्यक्ष किंवा कोणत्याही माध्यमातून संपर्क साधण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. न्यायालयाने म्हात्रे यांना आपला पासपोर्ट तात्काळ न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले असून, खटला पूर्ण होईपर्यंत तो न्यायालयाच्याच ताब्यात राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा सविस्तर लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतर जामिनाची औपचारिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर रमेश म्हात्रे यांची कल्याण येथील आधारवाडी कारागृहातून सुटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ।
