- तरुणीला प्रेमजाळ्यात ओढून, तिचे शोषण करून बळजबरीने निकाह लावण्याचा धक्कादायक प्रकार , याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी अरमान शेख या तरुणाला केली अटक ।
डोंबिवली : महाविद्यालयीन तरुणीला प्रेमजाळ्यात ओढून, तिचे शोषण करून बळजबरीने निकाह लावण्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीमध्ये घडला आहे. भिवंडीतील शांतीनगर भागात हा विवाह सोहळा पार पडणार होता, मात्र हिंदूवादी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी अरमान शेख या तरुणाला अटक केली असून त्याच्यावर पोक्सो (POCSO) अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित तरुणी ही डोंबिवलीतील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात एफवाय बीकॉमला शिकते. ती अल्पवयीन असतानाच तीन वर्षांपूर्वी तिची एका व्हिडिओ ऍपच्या माध्यमातून अरमान शेख याच्याशी ओळख झाली होती. अरमान शेख हा टेलरिंगचे काम करतो. त्याने या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी शारिरीक संबंध ठेवत त्याने लग्नाचा तगादा लावला होता. दोघांमध्ये जवळपास तीन वर्षे प्रेमसंबंध होते. मुलीच्या वयाची १८ वर्षे होताच लग्न करण्याचे ठरविले. काल हा विवाह भिवंडीतील शांतीनगर येथे होणार होता. लग्नासाठी काजी आणि साक्षीदार पोहचले. याचेळी हिंदूवादी कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी धडक दिली. हिंदू मुलीशी लग्न करतो म्हणून त्याठिकाणी मोठा गोंधळ झाला, अखेर हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. हे प्रकरण डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्याशी संबंधित असल्याने शांतीनगर पोलिसांनी तरुण तरुणीला विष्णूनगर पोलिस ठाण्याकडे पाठविले. पोलीस ठाण्यामध्ये तरुणीने अरमान खान याच्याविरोधात तक्रार दाखल केली. अरमानने आधी मैत्री केली. त्यानंतर शारीरीक संबंध ठेवले. तसेच ब्लॅकमेल करुन लग्नासाठी तगादा लावित होता, असं पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. अखेर या प्रकरणात अरमान शेख या तरुणाला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात पोक्साे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत ।
