तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून बाथरूममध्ये लपवण्यात आल्या ।

  • तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून बाथरूममध्ये लपवण्यात आल्या ।

डोंबीवली : कल्याणमधील मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून बाथरूममध्ये लपवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी महिलेने मृतदेह लवकर कुजावा आणि रक्तासह इतर महत्त्वाचे पुरावे नष्ट व्हावेत यासाठी बाथरूमचा नळ सलग सुरू ठेवला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्यानंतर आणि घरमालकाला आरोपी महिलेचा व्हॉइस मेसेज मिळाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी महिलेचा शोध सुरू केला असून तिला अटक करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कोलकात्याकडे रवाना झाले आहे. मलंग रोडवरील नीलकंठ सोसायटीतील एका फ्लॅटमधून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी मानपाडा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले असता संबंधित फ्लॅट बाहेरून बंद असल्याचे आढळले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तपासादरम्यान बाथरूममध्ये एक पोते आढळून आले. ते उघडून पाहिले असता त्यामध्ये एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक पथक आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक नमुने गोळा केले असून संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात संबंधित तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून बाथरूममध्ये ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या प्राथमिक संशयानुसार आरोपी महिलेने बाथरूमचा नळ मुद्दाम सुरू ठेवला होता. रोज येणाऱ्या पाण्यामुळे मृतदेह लवकर कुजावा तसेच रक्तासह इतर महत्त्वाचे पुरावे नष्ट व्हावेत, हा त्यामागील उद्देश असावा, अशी शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहे. या संपूर्ण प्रकरणाची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत असून त्यातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हत्या केल्यानंतर आरोपी महिला कोलकात्याकडे फरार झाली. मात्र, जाण्यापूर्वी तिने घरमालकाला एक व्हॉइस मेसेज पाठवला. या मेसेजमध्ये बाथरूममध्ये मृतदेह असल्याची तसेच नळ सुरू असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. हा व्हॉइस मेसेज मिळाल्यानंतर घरमालकाने तातडीने मानपाडा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेचा शोध वेगाने सुरू आहे. तिच्या अटकेसाठी पोलिसांचे विशेष पथक कोलकात्याकडे रवाना झाले असून पुढील तपास सुरू आहे ।