- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, श्रीकांत शिंदेंसह दोन खासदारांना लॉटरी लागण्याची शक्यता ।
नवी दिल्ली : पुढच्या काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता असून, यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोठ्या फेरबदलांचे संकेत मिळत आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ नंतर शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून, विद्यमान राज्यमंत्र्यांच्या पदांमध्ये फेरबदल होण्याची चर्चा सुरू आहे. या संभाव्य विस्तारामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, सध्या आयुष (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणारे प्रतापराव जाधव यांच्या कामकाजावर केंद्रात नाराजी असल्याची सूत्रांची माहिती असून, त्यांची मंत्रिपदावरून गच्छंती होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी ठाकरे गटातून फुटून आलेल्या दोन खासदारांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांना प्रत्येकी दीड-दीड वर्षांसाठी राज्यमंत्रिपद दिले जाण्याची चर्चा सुरू आहे ।
