- वॉन्टेड असलेल्या सराईत आरोपीला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील आझमगड येथून अटक केली ।
डोंबिवली : डोंबिवलीसह ठाणे, भिवंडी, पालघर, रायगड आणि ठाणे ग्रामीण परिसरात घरफोड्यांच्या अनेक गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या सराईत आरोपीला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील आझमगड येथून अटक केली. राजेश अरविंद राजभर (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा परिसरात वास्तव्यास होता. पोलीस तपासात राजभर याने विविध ठिकाणी घरफोड्या करून सुमारे ३८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याविरुद्ध ठाणे, रायगड आणि ठाणे ग्रामीण जिल्ह्यांमध्ये एकूण ३३ गुन्हे दाखल असून चौकशीदरम्यान त्याने २१ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. आरोपीच्या अटकेमुळे घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे ।
