तुकाराम मुंढे मेडिकल दुकानांबाबत अ‍ॅक्शन मोडवर, ‘फार्मासिस्ट’ नसलेली दुकाने बंद करण्याचे दिले आदेश ।

  • तुकाराम मुंढे मेडिकल दुकानांबाबत अ‍ॅक्शन मोडवर, ‘फार्मासिस्ट’ नसलेली दुकाने बंद करण्याचे दिले आदेश ।

मुंबई : राज्यातील औषध विक्री व्यवस्थेत शिस्तबद्धता आणण्यासाठी, अन्न व औषध प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. मेडिकल दुकानांमध्ये पात्र आणि नोंदणीकृत फार्मासिस्ट उपस्थित नसल्यास संबंधित दुकानांवर कारवाई करून, ते तात्काळ सील करण्याचे निर्देश FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मेडिकल दुकानांची तपासणी केली जाणार आहे. औषध विक्री ही थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने, औषधे विकताना नोंदणीकृत फार्मासिस्टची उपस्थिती कायद्याने अनिवार्य आहे. औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 तसेच संबंधित नियमांनुसार किरकोळ औषध विक्री परवानाधारक फार्मासिस्टच्या देखरेखीखालीच होणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक भागांत फार्मासिस्ट अनुपस्थित असतानाही, अन्य मेडिकल दुकाने सुरू असल्याच्या तक्रारी FDA कडे प्राप्त झाल्या होत्या. काही ठिकाणी परवान्यासाठी एका फार्मासिस्टचे नाव वापरले जाते; मात्र प्रत्यक्षात तो दुकानात उपस्थित नसल्याचेही निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त मुंडे यांनी जिल्हा व विभागीय अधिकाऱ्यांना अचानक तपासण्या करण्याचे आदेश दिले आहेत. तपासादरम्यान फार्मासिस्ट अनुपस्थित आढळल्यास दुकान बंद करण्यासह परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते. याशिवाय बनावट कागदपत्रे, दुसऱ्या फार्मासिस्टच्या नावाचा गैरवापर आणि नियमबाह्य औषध विक्री करणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे योग्य वितरण, डोसची माहिती, औषधांच्या परस्पर परिणामांची पडताळणी, कालबाह्य औषधे टाळणे आणि रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन करणे ही फार्मासिस्टची महत्त्वाची जबाबदारी असते. फार्मासिस्ट नसल्यास चुकीची औषधे देणे, डोसची चूक होणे किंवा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका वाढू शकतो. महाराष्ट्रात यापूर्वीही FDA ने अशाप्रकारच्या मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. 2021 मध्ये, राज्यभर तपासणीदरम्यान 3,460 मेडिकल दुकानांची पाहणी करण्यात आली होती. त्यापैकी 277 दुकाने फार्मासिस्टशिवाय सुरू असल्याचे आढळले होते. त्यानंतर 246 दुकानांवर ‘स्टॉप सेल’ची कारवाई करण्यात आली होती. तसेच याआधी अनेक जिल्ह्यांमध्ये परवान्याच्या अटींचे उल्लंघन, फार्मासिस्टची अनुपस्थिती आणि नियमबाह्य औषध विक्रीमुळे शेकडो मेडिकल दुकानांचे परवाने निलंबित किंवा रद्द करण्यात आले होते ।