शहाड उड्डाणपुल विस्तारीकरण आणि ठाकुर्ली ते म्हसोबा चौक उन्नत मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आचारसंहितेनंतर सुरुवात, शहरांतर्गत वाहतुकीला मिळणार गती ।

  • शहाड उड्डाणपुल विस्तारीकरण आणि ठाकुर्ली ते म्हसोबा चौक उन्नत मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आचारसंहितेनंतर सुरुवात, शहरांतर्गत वाहतुकीला मिळणार गती ।
  • खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे दोन्ही मार्गांच्या उभारणीचे काम दृष्टीपथात ।

कल्याण : कल्याण अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर शहाड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे विस्तारीकरणाचे प्रत्यक्ष काम विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर लागलेल्या आचारसंहितेनंतर सुरु होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी या कामासाठी ३२० कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली होती. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. सध्या दोन पदरी असलेला हा उड्डाणपूल चार पदरी होणार आहे. त्यामुळे येथे होणारी वाहतूक अधिक जलदगतीने होणार आहे. तर याच पद्धतीने ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौकापर्यंत उर्वरित उन्नत मार्ग बांधणे व १५ मी. रुंद रस्ता विकसित करण्यात येणार आहे. सुमारे ३६ कोटी रुपयांच्या निधीतून याची उभारणी केली जाणार असून याचे काम देखील आचार संहितेनंतर सुरु होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आपल्या मतदारसंघात वेगवान रस्ते वाहतुकीसाठी कायम आग्रही असतात. त्यामुळे हजारो कोंटींचे अनेक गेमचेंजर प्रकल्प कल्याण लोकसभा मतदारसंघात सुरू आहेत. मेट्रो, रस्ते, पूल, उड्डाणपूल, रस्ते रूंदीकरण, रेल्वे मार्गांचे विस्तारीकरण अशा अनेक प्रकल्पांमधून नागरिकांची वाहतूक गतीमान झाली आहे. कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपूल शहरांतर्गत वाहतुकीसाठी देखील अत्यंत महत्वाचा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार शहाड स्टेशन येथील रेल्वेउड्डाणपुलाच्या कल्याण बाजूच्या रस्त्याची रुंदी ३० मीटर असून उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील ३६ मीटर आहे. या उड्डाणपुलावरची वाहतूक गेल्या काही वर्षात वाढली आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला चार पदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र उड्डाणपूल फक्त दुपदरी असल्याने अनेकदा उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या प्रवेशद्वारावर कोंडी होत असते. कधी वाहन उड्डाणपुलावर बंद पडल्यास अथवा उड्डाणपुलाची दुरूस्ती हाती घेतल्यास एकाच मार्गिकेवरून वाहतूक होते. परिणामी दोन्ही बाजूने कोंडी होत असते. त्यामुळे या उड्डाणपुलाचे विस्तारीकरण करण्याची स्थानिकांकडून मागणी करण्यात येत होती. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाची आग्रही मागणी केली होती. त्यासाठी निधीही मंजूर करून देण्यात आला होता. त्यासाठी आवश्यक पूर्तता झाल्यानंतर आता एमएमआरडीएने या कामासाठी काही महिन्यांपूर्वी ३२० कोटी रुपयांची निविदा जाहीर केली होती. वाहनांची गर्दी आणि वाहतूककोंडीमुळे होणाऱ्या अपघात टाळण्यासाठी शहाड स्टेशन येथील रेल्वेउड्डाणपूल २+२ असा चार पदरी विकसित करणे गरजेचे होते. याच पार्श्वभूमीवर या पुलाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून प्रत्यक्ष काम विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर लागलेल्या आचारसंहितेनंतर सुरु होणार आहे. या रेल्वेउड्डाणपुलाची एकूण लांबी १०९० मीटर इतकी आहे. या पुलाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर शहाड पुलावरची कोंडी लवकरच फुटणार आहे. त्याबदद्ल नागरिकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत. ठाकुर्ली लेव्हल क्रॉसिंग ते मानपाडा चौकादरम्यानच्या उन्नत रस्त्याचे बांधकाम आणि १५ मीटर रुंदीच्या जोडरस्त्यांचा विकास या प्रकल्पामध्ये करण्यात येणार आहे. परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीवरील ताण, प्रवासातील विलंब, तसेच अपघाताचा धोका कमी करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. ठाकुर्ली, मानपाडा, डोंबिवली परिसरातील नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि जलद वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक ठरणार असून, स्थानिक भागातील वाहतूक जलदगतीने होण्यास हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. सुमारे ३६ कोटी रुपयांच्या निधीतून याची उभारणी होणार आहे. याची देखील निविद प्रक्रिया झाली असून आचार संहितेनंतर याच्या उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे ।

या प्रकल्पाची वैशिष्ट्ये – 

• उन्नत मार्ग – लांबी -360 मी, रुंदी – 7.5 मी. 

• रस्ता – लांबी -1050 मी, रुंदी – 7.5/8.5 मी

प्रकल्पाचे फायदे – 

• वाहतुकीची क्षमता वाढेल.

• प्रवासाचा वेळ कमी होईल आणि

विलंब टळेल.