शिवसेनेच्या वतीने दुर्गाडी परिसरात जोरदार घंटानाद आंदोलन करत प्रशासनाचा निषेध ।

  • शिवसेनेच्या वतीने दुर्गाडी परिसरात जोरदार घंटानाद आंदोलन करत प्रशासनाचा निषेध ।

कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना प्रवेशबंदी केली जाते, ही बाब संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावणारी असल्याचा तीव्र संताप शिवसेनेने व्यक्त केला. या अन्यायकारक निर्णयाविरोधात शिवसेनेच्या वतीने दुर्गाडी परिसरात जोरदार घंटानाद आंदोलन करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. १९८२ साली शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या बंदीला जाहीर विरोध करत हिंदूंच्या हक्कासाठी लढा उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दुर्गाडी किल्ल्यावर घंटानाद आंदोलनाची परंपरा सुरू केली. पुढे शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे यांनी ही हिंदुत्वाची परंपरा अधिक आक्रमकपणे कायम ठेवत हिंदूंच्या हक्कासाठी संघर्ष सुरू ठेवला. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली हजारो शिवसैनिक दुर्गाडी परिसरात एकवटले आणि जोरदार घोषणाबाजी करत घंटानाद आंदोलन केले. संपूर्ण परिसर ‘जय भवानी… जय शिवाजी’, ‘हिंदुत्वाचा विजय असो’ अशा घोषणांनी दणाणून गेला. हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर कुठल्याही प्रकारची बंदी सहन केली जाणार नाही, असा संदेश शिवसेनेने प्रशासनाला दिला. दुर्गाडी देवीचे दर्शन घेणे हा प्रत्येक हिंदूचा अधिकार असताना, दरवर्षी प्रशासनाकडून लादली जाणारी बंदी ही अन्यायकारक आणि हिंदूंच्या भावनांवर घाला घालणारी असल्याची भूमिका शिवसैनिकांनी यावेळी ठामपणे मांडली. “आमच्या देवळात जाण्यापासून आम्हालाच रोखले जाते, हे हिंदू समाज कधीही सहन करणार नाही,” असा इशारा आंदोलनादरम्यान देण्यात आला. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, सुभाष साळुंखे यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, महिला आघाडी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते ।