- जालना जिल्हा परिषदेवर भगवा फडकवा, शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जालना जिह्यातील पदाधिकाऱ्यांना निर्देश ।
- मराठवाड्यात खासदार डॉ. शिंदेंचा झंझावाती शिवसंवाद दौरा ।
जालना : जालना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, यादृष्टीने शिवसेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आतापासून कामाला लागा, असे निर्देश शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले. खासदार डॉ. शिंदे शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने आज जालना जिल्ह्यातील जालना, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी आणि परतूर विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला. यावेळी खासदार संदीपान भुमरे, मंत्री संजय शिरसाट, आमदार अर्जुन खोतकर, आमदार अब्दुल सत्तार, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार आनंद परांजपे आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी जालना शहरात झालेल्या बैठकीत खासदार डॉ. शिंदे म्हणाले की मराठवाड्यातील मतदार शिवसेनेसोबत आहे. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठवाड्यात अनेक योजना आणि भरघोस विकास निधी दिला. मराठवाड्यातून महायुतीचे ४० आमदार निवडून आले होते. शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदार मराठवाड्यात आहेत. आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात जालना महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेला चांगली कामगिरी करता आली. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी आतापासूनच कामाला लागा असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. कार्यकर्ता काय काम करत असतो याची नोंद पक्ष नेतृत्व घेत असते असे ते म्हणाले. मतदार याद्या पुनरीक्षणासाठी पक्षाने जे बीएलए नियुक्त केले आहेत त्यांनी एसआयआर सुरू होताच बीएलओ सोबत घरोघरी जावे. आपल्या मतदाराचे नाव यादीत आहे की नाही याची खात्री करावी अशा सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिल्या. जालना जिल्हा परिषदेचे ५७ गट असून ८ पंचायत समित्यांचे ११४ गण आहेत. ओबीसी आरक्षण मर्यादा ओलांडल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लांबणीवर पडली आहे. तत्पूर्वी खासदार डॉ. शिंदे यांची जालना शहरातील उद्योजक आणि डॉक्टर यांच्यासमवेत बैठक झाली. घनसावंगी येथे झालेल्या दुसऱ्या आढावा बैठकीत खासदार डॉ. शिंदे यांनी तालुका प्रमुख आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी शिवसेना आमदार हिकमत उढाण व मंत्री संजय शिरसाट, माजी खासदार आनंद परांजपे, जयदीप बोराडे उपस्थित होते. परतूर आणि घनसावंगी मतदार संघात सर्व बीएलएची नियुक्ती झाली आहे. लवकरच त्यांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित केले जाईल, असे आमदार उढाण म्हणाले. जिल्हा परिषदेवर परतूर आणि घनसावंगी मधून जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी शिवसैनिकांनी मजबुतीने प्रयत्न करावेत, असे मत खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. शिवसंवाद दौऱ्यातून पक्षाचे खासदार, आमदार , मंत्री काम करतात की नाही याचा आढावा थेट कार्यकर्त्यांकडून घेतला जातो. हा अहवाल थेट शिंदे साहेबांना सादर केला जात असल्याने कार्यकर्त्यांना न्याय मिळतो असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
खासदार डॉ. शिंदे तीन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे शिवसंवादच्या निमित्ताने तीन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून ते जालना, नांदेड ,हिंगोली आणि बीड या जिल्ह्यातील विधानसभानिहाय मतदार संघांचा आढावा घेणार आहेत ।
Post Views: 11
