कल्याण शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलिसांकडून रविवारी मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर विशेष कॉम्बिंग ऑपरेशन ।

  • कल्याण शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलिसांकडून रविवारी मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर विशेष कॉम्बिंग ऑपरेशन ।

कल्याण : कल्याण शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी महात्मा फुले चौक पोलिसांकडून रविवारी मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. पोलीस उपायुक्त, परीमंडळ-३ अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने कल्याण विभाग यांच्या उपस्थितीत हे ऑपरेशन पार पडले. 11 मे 2026 रोजी रात्री 11 ते पहाटे 12.30 दरम्यान महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीतील कल्याण रेल्वे स्टेशन परिसर, एसटी बस स्थानक, झुंजारराव मार्केट, नीलम गल्ली, हॉटेल्स आणि लॉजेस परिसरात ही व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणारे, अमली पदार्थांचे सेवन करणारे तसेच संशयित हालचाली करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई केली. काही वारंगनांनाही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली. पोलिसांनी विविध कायद्यांअंतर्गत एकूण ३३ कारवाया केल्या असून त्यामध्ये मुंबई पोलीस कायदा, एनडीपीएस कायदा तसेच मुंबई प्रोहिबिशन ऍक्टअंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले. याशिवाय शहरातील ४ लॉजेसची सखोल तपासणी करण्यात आली. या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्यासह महात्मा फुले चौक, खडकपाडा, बाजारपेठ आणि कोळशेवाडी पोलीस ठाण्यातील तब्बल ३२ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. तसेच सीआरएम मोबाईल पथकांनीही कारवाईत सहभाग घेतला. शहरातील गुन्हेगारी आणि अवैध प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले ।