- रविंद्र चव्हाण यांनी साक्षीच्या कामगिरीचे कौतुक केले ।
डोंबीवली : भारतीय महिला बॉक्सिंगपटू साक्षी चौधरी हिने ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये महिलांच्या ५१ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे अभिनंदन करत तिच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे कौतुक केले आहे. रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून तसेच कल्याण-डोंबिवली रनर्स ग्रुप आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन’ हाफ मॅरेथॉनमध्ये २०२५ साली साक्षी चौधरी प्रमुख पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. त्या भेटीच्या आठवणींना उजाळा देताना चव्हाण यांनी, त्यावेळीच साक्षीमध्ये असलेली जिद्द, कठोर परिश्रम करण्याची तयारी आणि विजेतेपदासाठीची लढाऊ वृत्ती स्पष्टपणे जाणवली होती, असे नमूद केले. “आज साक्षीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी सुवर्णपदक जिंकून देशाचा गौरव वाढवला आहे. तिच्या यशाचा अभिमान वाटतो. आगामी कारकिर्दीसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा,” अशा शब्दांत रविंद्र चव्हाण यांनी साक्षीच्या कामगिरीचे कौतुक केले आहे ।
