जिल्हा परिषद कार्यालयाचे बनावट सही-शिक्के वापरून अनधिकृत इमारतीचे बांधकाम, चौघांविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ।

  • जिल्हा परिषद कार्यालयाचे बनावट सही-शिक्के वापरून अनधिकृत इमारतीचे बांधकाम, चौघांविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ।

डोंबिवली : ठाणे जिल्हा परिषदेचे खोटे सही-शिक्के तयार करून त्यांचा वापर करत अनधिकृत इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी शासनासह सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रेरणा बळीराम जाधव यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींनी जुन्या चाळीतील घरे पाडून त्या जागेवर अनधिकृत इमारत उभारली. तसेच इमारतीला जिल्हा परिषदेची कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलेला नव्हता. इमारतीतील सदनिका धारकांना गृह कर्ज मिळावे याकरिता ठाणे जिल्हा परिषदेचे बनावट सही व शिक्के वापरून खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यानंतर या बनावट कागदपत्रांच्या आधारे नागरिकांना सदनिका विकण्यात आल्याचा आरोप आहे. हा संपूर्ण प्रकार संबंधित सदनिकेचे बँक कर्ज (लोन) हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान उघडकीस आला. कागदपत्रांची पडताळणी करताना जिल्हा परिषदेच्या सही व शिक्क्यांमध्ये संशयास्पद बाबी आढळून आल्याने प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि फसवणुकीचा पर्दाफाश झाला. या प्रकरणातील आरोपींमध्ये रामचंद्र माने, मोहन चौधरी, रामदास टेकाळे आणि लक्ष्मण मिसाळ यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 3(5), 318(4), 336(2), 336(3), 340(2), 337, 338 आणि 343 तसेच नोंदणी अधिनियम, 1908 मधील कलम 82(अ), 82(ब) व 82(क) अंतर्गत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल करणे, अनधिकृत बांधकाम उभारणे आणि नागरिकांना घरे विकून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप या चौघांवर ठेवण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत ।